इस्रायलने गाझा पट्टय़ात केलेल्या हल्ल्यात सहा ठार झाले असून त्यात एका गर्भवती महिलेचा व दोन मुलांचा समावेश आहे, त्यामुळे पॅलेस्टाईनमधील मृतांची संख्या ८१५ झाली आहे. गेले १८ दिवस इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष चालू असून आता तो पश्चिम किनारा भागाकडे सरकत आहे. जेरुसलेमच्या उत्तरेला इस्रायलविरोधी निदर्शनात दोन युवक ठार झाले असून संघर्ष चिघळत चालला आहे.
पॅलेस्टाईनमधील इस्लामी जिहाद या बंडखोर गटाचा वरिष्ठ नेता व त्याचे मुलगे इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले असे गाझा आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सलमान हासनेन व त्याचे १२ व १५ वर्षे वयाचे दोन मुलगे दक्षिणेकडील रफाह शहरात मारले गेले. दुसरा हल्ला गाझा शहरातील डेर अल बलाह येथे झाला त्यात २३ वर्षांची गर्भवती महिला ठार झाली, पण तिच्या न जन्मलेल्या बाळाचे प्राण मात्र शल्यक्रिया तज्ञांनी वाचवले त्यामुळे आईविना हे बाळ जन्म घेऊ शकले. हमासच्या लष्करी विभागाने असा दावा केला की, बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन रॉकेट हल्ले करण्यात आले.
दरम्यान इस्रायली दलांनी जेरुसलेम येथे अल अकसा मशिदीजवळ चकमकी होण्याचा इशारा दिला होता. दोन पॅलेस्टिनी निदर्शक मारले गेल्यानंतर जेरुसलेमच्या उत्तरेकडे पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला. रामल्ला, नब्लूस, बेथलहेम व जेरुसलेम येथे निदर्शने करण्यात आली. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी ठार झाले. गाझा पट्टय़ात संयुक्त राष्ट्रांनी चालवलेल्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात १५ पॅलेस्टिनी ठार तर २०० जण जखमी झाले.  संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सध्या १ लाख १८ हजार लोक संयुक्त राष्ट्रांच्या छावण्यात आश्रयाला असून आतापर्यंत ८१५ ठार, तर ५ हजार जण जखमी झाले आहेत. ३२ इस्रायली सैनिक मारले गेले असून दोन नागरिकही ठार झाले आहेत.