माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या १८ समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्यामुळे धोक्यात आलेल्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारने शुक्रवारी राजस्थान विधानसभेत विश्वासदर्शक ठरावजिंकला. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना गेहलोत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आणि आपले सरकार खाली खेचण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप केला.

संसदीय कार्यमंत्री शांती धारिवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला तो आवाजी मतदानाने मंजूर झाला. सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदार स्वगृही परतल्याने सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकणार ही केवळ औपचारिकताच होती.

भाजपने कितीही प्रयत्न केले तरी कोणत्याही स्थितीत आपण सरकार कोसळू देणार नाही, राज्यातील संघर्षांचा शेवट गोड झाला आणि त्यामुळे भाजप चांगलाच पोळला. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश येथे काय झाले, निवडून आलेले सरकार खाली खेचण्यात आले, लोकशाही धोक्यात आणली, काँग्रेस पक्षाच्या सरकारला भाजप लक्ष्य करीत असल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला.

आपले सरकार पाडण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्याने कट रचला होता, समाजमाध्यमांवर काही फिती व्हायरल झाल्यानंतर ते सुस्पष्ट झाले, असेही गेहलोत यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता सांगितले. गेहलोत यांचा गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे अंगुलीनिर्देश होता, गजेंद्रसिंह यांनी मात्र काँग्रेसचा आरोप फेटाळला होता. काँग्रेस पक्षांतर्गत मतभेदांचे खापर गेहलोत यांचे समर्थक आमच्यावर फोडत असल्याचा आरोप भाजपने केला.

विरोधी पक्षात असताना ज्या सचिन पायलट यांनी पक्ष मजबूत केला तेच माजी उपमुख्यमंत्री सरकार स्थापन झाल्यावर कसे काय कुचकामी ठरले, असा सवाल विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी केला.

कोणत्याही स्थितीत पक्षाचे रक्षण करणार – पायलट

जयपूर : बंडाचे निशाण फडकवून पुन्हा स्वगृही परतलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी शुक्रवारी राज्यातील राजकीय घडामोडींवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. आपण काँग्रेस पक्षातील  सामथ्र्यवान योद्धा आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेसचे संरक्षण करू, असे पायलट यांनी सांगितले.

राजस्थान विधानसभेत सत्तारूढ पक्षाने विश्वासदर्शक ठराव मांडला होता त्यावरील चर्चेत सहभागी होताना पायलट यांनी वरील बाब स्पष्ट केली. चर्चेदरम्यान विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी विविध प्रकरणांत पायलट यांच्या नावाचा आणि त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा उल्लेख केला. विरोधक सातत्याने आपले नाव घेत आहेत, आपले आसन बदलण्यापूर्वी आपण सरकारमधील एक घटक होतो, विधानसभेचे अध्यक्ष आणि पक्षाचे मुख्य प्रतोद यांनी आपल्याला आता हे आसन का दिले याचा आपण विचार केला, क्षणभर विचार केल्यानंतर लक्षात आले की दिलेले आसन सीमेवरील आहे. एका बाजूला सत्तारूढ पक्ष तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आहे, सीमेवर कोणाला पाठविले जाते, सर्वात सामथ्र्यवान योद्धय़ाला, असे पायलट म्हणाले.