काचेवर कलाकुसर करून त्याचे मणी तयार करण्याच्या जुन्या कलेला जिऑग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री ऑफ इंडियाने जीआय प्रमाणन (भौगोलिक ओळख) देणार असून ही नष्ट होत चाललेली कला आता टिकून राहणार आहे. त्यामुळे हजारो कलाकारांचे गमावले जाणारे रोजगारही टिकणार आहेत.
या कलेला जीआय प्रमाणपत्र देण्याचा अर्ज स्वीकारण्यात आला असून त्याची राजपत्रित अधिसूचना काढण्यात आली. आता विशिष्ट काळात याला जीआय दर्जा मिळणार हे निश्चित झाले आहे असे ट्रेडमार्क्‍स अँड जिऑग्राफिकल रजिस्ट्रेशन या संस्थेचे सहायक निबंधक सी.जी.नायडू यांनी सांगितले.
बनारस बीड्स असोसिएशनचे अशोक गुप्ता यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांपासून या मण्यांच्या कलेला जीआय प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न सुरू होते. निर्यात उत्तेजन आयुक्तांनी व लघु उद्योग खात्यानेही त्यासाठी प्रयत्न केले आहेत. काचेपासून मणी तयार करतात, त्याला ‘काच के मोती’ असे म्हटले जाते. काचेच्या मण्यांचे पन्नास हजार प्रकार उपलब्ध आहेत.
गुप्ता यांचे वडील कन्हय्यालाल यांनी बनारस येथील हिंदू विद्यापीठातून १९३८ मध्ये एका झेक दांपत्याकडून काचेचे मणी तयार करण्याची कला शिकली. पंडित मदनमोहन मालवीय यांनी या दांपत्याल बनारसला आमंत्रित केले होते.

*काचेच्या मण्यांचा व्यवसाय करणारी खेडी – मिर्झापूर, सोनभद्र, वाराणसी
*लोकांचा सहभाग – १० हजार
*निर्यात – दहा वर्षांपासून निर्यात सुरू होती
*आव्हाने – चीनचे मणी आता बाजारपेठेत आले आहेत. चीन, इटली, झेक येथे यंत्रावर मणी तयार केले जातात, ते आपण आयात करतो.

काचेचे मणी कसे तयार करतात?
काचेच्या नळ्या रॉकेलच्या दिव्यावर धरल्या जातात व तापवल्या जातात नंतर एअर ब्लोअरने वेगवेगळ्या आकाराचे मणी पाडून ते सजवले जातात. काचेत सोने किंवा चांदी वापरून चमक दिली जाते.