जगातील दिग्गज कार उत्पादक कंपनीपैकी एक फॉक्सवॅगनच्या ऑडी डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रूपर्ट स्टॅडलर यांना सोमवारी सकाळी जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. डिझेल गाडीच्या इंजिनात फेरफार करून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

वर्ष २०१५ मध्ये एका अमेरिकन संस्थेने फॉक्सवॅगनच्या कारमध्ये गडबड असल्याचे म्हटले होते. प्रदूषण तपासणीला चकवा देण्याच्या इराद्याने १.१ कोटी कारच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप करण्यात आला होता. फॉक्सवॅगनवर डिझेल एमिशन घोटाळ्याप्रकरणी १ अब्ज युरोचा (सुमारे १.१८ अब्ज डॉलर) दंड ठोठावण्यात आला होता. जर्मनी सरकारकडून कोणत्याही कंपनीला करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा दंड आहे. जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेच्या याचिकेवरील समजोत्यानंतर फॉक्सवॅगनने डिझेल इंजिनमध्ये बेकायदारित्या सॉफ्टवेअर लावल्याबद्दल ४.३ अब्ज डॉलर दंड देण्यास सहमती दर्शवली होती.