News Flash

भाजापाचा आमदार निवडून आल्यास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देणार इनोव्हा

पुढील वर्षीच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु

प्रातिनिधिक फोटो

तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीची तयारी भाजपाने आतापासूनच सुरुवात केलीय. पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान २५ जागा जिंकण्यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुरुगन यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा उमेदवार जिंकल्यास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एक एक इनोव्हा कार देण्याचं आश्वासन दिलं आहे. मुरुगन यांनी या पूर्वीही यासंदर्भात भाष्य केलं असं तरी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये या आश्वासनाची पुन्हा एकदा आठवण करु देत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिले. या बैठकीला राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे आणि निवडणुकीला जोशाने सामोरे जावे अशी अपेक्षा मुरुगन यांनी व्यक्त केली आहे. द फ्री प्रेस जर्नलने मरुगन यांनी यापूर्वी ऑगस्ट महिन्यामधील एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्येही हे आश्वासन दिल्याचं वृत्त दिलं होतं.

पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला किमान २५ आमदार निवडून आणायचे आहेत असं मुुरुगन यांनी स्पष्ट केलं आहे. किमान २५ आमदार असतील तर राज्यात कोणाचे सरकार येईल हे ठरवण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. याचसंदर्भात बोलत असताना त्यांनी आमदार निवडून आल्यास त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला इनोव्हा कार देण्याचं आश्वासन मुरुगन यांनी दिलं.

तामिळनाडूमध्ये अशाप्रकारे बक्षीस देणं काही नवीन गोष्ट नाही. राज्यामधील दोन मोठे पक्ष असणारे एआयडीएमके आणि डीएमकेकडून अनेकदा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या देतात. मात्र अशाप्रकारे भाजपाकडून बक्षीसाची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भारतामधील अनेक राज्यांमध्ये विजयी कमळ फुलवणाऱ्या भाजपाचा दाक्षिणात्य राज्यांमध्ये फारसा प्रभाव दिसत नाही. तामिळनाडू अशाच राज्यांपैकी एक आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकींमध्ये आपली दखल घ्यावी लागेल इतक्या जागा जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सध्या भाजपा आणि एआयएडीएमकेची युती आहे. मात्र वेटरीवल यात्रेच्या मुद्द्यावरुन या दोन्ही पक्षांचे मतभेद झाले होते. जाती आणि धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन करणाऱ्या यात्रांना परवानगी देऊ नये अशी भूमिका एआयएडीएमकेने आपल्या मुखपत्रामधून व्यक्त केली आहे. भाजपाला एआयएडीएमकेसोबतची युती कायम ठेवायची असून या मतभेदांनंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह २१ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 8:30 am

Web Title: get bjp mla elected in tamil nadu win an innova scsg 91
Next Stories
1 Corona Vaccine : भारत बायोटेकच्या स्वदेशी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात
2 नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
3 देशात करोनाबाधितांचा निचांक
Just Now!
X