ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकांवरून आता राजकारण सुरू झालं आहे. यादरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आपले स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील घेऊन या आणि भाजपा शहरात किती जागा जिंकते हे पाहा, असं ओवेसी म्हणाले.

“तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या शहरात आणा आणि निवडणुकीचा प्रचार करा, आम्ही पाहतो काय होतं? या ठिकाणी त्यांच्या बैठका आणि रॅलींचही आयोजन करून पाहा आम्ही पाहतो त्यांच्या किती जागा निवडून येतात,” असं एका सभेत संबोधित करताना ओवेसी यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. “ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. तरीही ते विकासावर बोलणार नाहीत. हैदराबाद एक विकसित शहर बनलं आहे. या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. परंतु भाजपाला हैदराबादची ओळख पुसायची आहे,” असंही ओवेसी म्हणाले.

यापूर्वीही साधला होता निशाणा

भाजपाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष खासदार बंडी संजय कुमार यांनी केलेल्या विधानावर ओवेसी यांनी पलटवार केला होता. ”हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा. भाजपा लडाखमध्ये असे धाडस का दाखवत नाही, जिथं चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतलेली आहे.” असं ओवेसींनी म्हटलं आहे.

”भाजपावाल्यानो जर सर्जिकल स्ट्राइक कुठं करायची आहे, तर असदुद्दीन ओवेसी ज्याला तुम्ही प्रक्षोभक भाषण करणारा म्हणतात. मी तुम्हाल पुन्हा एकदा सांगतो की, जर तुमच्यात हिंमत असेल तर मागील काही महिन्यांपासून लडाखमध्ये जिथं चिनी सैन्याने भारतीय जमीन ताब्यात घेतली आहे, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात? तुम्ही या देशाचे पंतप्राधान आहात व चीनचं नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा , आम्ही तुमची प्रशंसा करू. सर्जिकल स्ट्राइककरून चिनी सैन्याला पळवून लावा. आपल्या लष्काराचे जवान जिथं शहीद झाले होते, तिथं तुम्ही धाडस दाखवणार नाही. भारतीय जमीन ताब्यात घेणार नाहीत. मात्र त्यांचा एक नेता म्हणतो की आम्ही जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राइक करू. तुम्ही काय सर्जिकल स्ट्राइक करणार? तुम्ही शहरासाठी काय केले आहे?” असंही ते एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते.