ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर होते, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. कर्नाड यांच्यासह बी टी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्‍नामला स्‍वामी आणि विचारवंत सी एस द्वारकानाथ हे देखील त्यांच्या हिटलिस्टवर होते, असे समजते.

गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के टी नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा जणांना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून हस्तलिखितांच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या मिळाल्या आहेत. यात सांकेतिक भाषांचा वापर असून गिरीश कर्नाड, बी टी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची नावे या डायरीत असल्याचे समोर आले आहे. चौघांनीही कट्टर हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती. द्वारकानाथ यांनी प्रभू राम अस्तित्वात नाही, असे विधान केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘डायरीत नावं असलेली सर्व मंडळी ही गौरी लंकेश यांचे समर्थक होते किंवा लंकेश यांच्या विचारांशी सहमत होते. त्या सर्वांनी वेळोवेळी हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती’, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. सांकेतिक भाषेची उकल केली जात असून यानंतर नेमकी माहिती समजू शकेल’, असे एसआयटीमधील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील चार संशयिताना विवेकवादी चळवळीचे के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी अटक झाली आणि याच आरोपींचा गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभाग असल्याचेही समोर आले. दोन दिवसांपूर्वीच एसआयटीने परशुराम वाघमारे (वय २६ वर्ष) याला अटक केली. वाघमारेचा हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळ्या झाडणारी व्यक्ती वाघमारेसारखी दिसत असल्याचे समोर आले.

गिरीश कर्नाड यांना २०१५ मध्येही धमकी देण्यात आली होती. बेंगळुरुतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे, असे विधान कर्नाड यांनी केले होते. यानंतर त्यांना ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. वादानंतर कर्नाड यांनी माफी देखील मागितली होती.