अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल काहीही लागो. या निवडणुकीत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोघांकडून एक मुद्दा सातत्याने समोर आलाय.

रशिया.

एकेकाळची अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून असलेली ही महासत्ता. नव्वदच्या दशकात तिच्या विघटनाला सुरुवात झाली. त्याआधी १९८९ साली पडून गेलेल्या बíलनच्या भिंतीनं कम्युनिस्ट राजवटींचा अंतारंभ झाला. पुढे २००० साली व्लादिमीर पुतिन यांच्याकडे या देशाची सूत्रं आली आणि सगळं चित्रच बदललं. त्यांच्या रूपानं आधुनिक आणि अर्निबध एकाधिकारशाहीचा नवा उदय झाला असून जगातल्या अनेक नेत्यांना तिचं आकर्षण वाटू लागलं आहे.

त्यातलेच एक म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प. या उमेदवारानं यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा पक्षाला फाटा दिला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. पण म्हणून रिपब्लिकन पक्ष त्याच्या ध्येयधोरणांसह ट्रम्प यांच्यासमवेत आहे, असं नाही. खरं तर नाहीच. या पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्याशी फारकत घेतली असून त्यांच्या अनेक धोरणांशी पूर्णपणे असहमती दर्शवली आहे.

त्यातलं एक रशियाबाबतचं. ट्रम्प यांनी आतापर्यंत अर्धा डझन वेळा तरी प्रचारात पुतिन यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. वास्तविक ऐतिहासिकदृष्टय़ा रिपब्लिकन आणि रशिया यांचे संबंध कधी विशेष प्रेमाचे होते असं नाही. अमेरिकेत मुळात रिपब्लिकन नेते हे युद्धखोरीसाठी ओळखले जातात. थोरले आणि धाकटे बुश ही याची अलीकडची उदाहरणं. धाकटय़ा बुश यांचे उपाध्यक्ष डिक चेनी, संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी सातत्याने रशियाविरोधात कडक.. कधी तर चिथावणीखोर भूमिकाच घेतली.

त्यामुळे ट्रम्प यांचं हे रशियाप्रेम अनेकांना चक्रावून टाकणारं आहे. ‘जागतिक राजकारणाच्या पटलावर पुतिन हे अमेरिकचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा अधिक दमदारपणे वागले आणि वागतात’, ‘ओबामा हे एका महासत्तेचे प्रमुख वाटतच नाहीत’, ‘सीरिया प्रकरणात ओबामा यांच्यापेक्षा पुतिन हे अधिक भक्कमपणे वागले’, ‘देशांतर्गत राजकारणावर, प्रशासनावर पुतिन यांची जेवढी पकड आहे तेवढी ओबामा यांची नाही’.. अशी अनेक विधानं ट्रम्प यांनी केली.

अमेरिकेच्या अध्यक्षानं दुसऱ्या देशाच्या.. आणि त्यातही विशेषत: रशियाच्या.. प्रमुखाची भलामण करण्याचा प्रकार याआधी कधीही घडलेला नाही. किंबहुना अमेरिकी जनतेला, आम्ही रशियायी  देशप्रमुखापेक्षा किती आणि कसे वेगळे आहोत, जागतिक राजकारणात अमेरिकेची भूमिका ही रशियापेक्षा कशी जगाच्या भल्याची आहे हे सांगण्यात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन उमेदवारांत चुरस असते. त्यामुळे ट्रम्प यांचं हे पुतिनप्रेम अनेक अमेरिकनांना चक्रावून टाकणारं आहे. आपल्या प्रतिस्पध्र्यावर पुतिन यांच्या काठीने कोरडे ओढण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न हाच मुळात आता राजकीय मुद्दा बनून गेलाय.

मंगळवारी उपाध्यक्षीय उमेदवारांच्या वादफेरीत रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स यांना हिलरी यांचे डेमोक्रॅटिक साथीदार टिम केन यांनी ट्रम्प यांच्या वाढत्या पुतिनप्रेमाच्या मुद्दय़ावरच हिणवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज डेमोक्रॅटिक पक्षानं ट्रम्प यांच्यावर रशियात मोठी गुंतवणूक केल्याचा ठपका ठेवला. ट्रम्प यांना पुतिन यांचं प्रेम आहे कारण पुतिन यांनी या बिल्डरला रशियात मोठमोठे इमले उभारायला मदत केलीये, असा डेमोक्रॅटिक पक्षाचा आरोप. अत्यंत पाशवी, कोणतीही नीतिमूल्यं न मानणाऱ्या पुतिन यांचं आकर्षण ट्रम्प यांना आहे आणि तेदेखील पुतिन यांच्याप्रमाणेच एकाधिकारशहा आहेत, त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली गेली तर तेही पुतिन यांच्याप्रमाणे बेबंदशाही आणतील, अशी नवीन आघाडी आता डेमोक्रॅटिक पक्ष ट्रम्प यांच्या विरोधात उघडताना दिसतो.

हे झाल्यानंतर ट्रम्प यांचे थोरले चिरंजीव वडिलांच्या बचावार्थ प्रचाराच्या रणमदानात उतरले. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला आता आव्हान दिलंय. हे कुमार ट्रम्प म्हणाले, आमची कंपनी अशी उत्पादनं बनवते की जी लपून राहूच शकत नाहीत. तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षानं रशियात ट्रम्प टॉवर किंवा तत्सम काही इमारती आहेत किंवा काय ते शोधून पाहावं, आम्ही त्या इमारती डेमोक्रॅटिक पक्षाला द्यायला तयार आहोत.

वास्तविक तर्काच्या कसोटीवर पाहू गेल्यास त्यांचा हा खुलासा हास्यास्पद ठरतो. याचं कारण आपली नाममुद्रा न उमटवतादेखील ट्रम्पच काय कोणीही इमारती उभ्या करू शकतो. आणि दुसरं म्हणजे ही गुंतवणूक बेनामीदेखील असू शकते किंवा रशियातल्या कोणाच्या भागीदारीतही असू शकते. ट्रम्प यांचा लौकिक पाहता ते असं करणारच नाहीत, याची ग्वाही कोणीही देणार नाही. भारतात भाजपचे धनाढय़ आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा समूहाबरोबर आणि पुण्यात शरद पवार यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पंचशील समूहाबरोबर ट्रम्प यांचे भागीदारीचे प्रयत्न सुरू होते. न्यूजवीक साप्ताहिकाचा पत्रकार कुर्त आयशेनवाल्ड (हा कुर्त आधी न्यूयॉर्क टाइम्समधे होता. ऊर्जा क्षेत्रावर लिहायचा. एन्रॉन प्रकरण यानं जवळून हाताळलं. त्यावर आधारित त्याचं ‘कॉन्स्पिरन्सी ऑफ फूल्स’ हे पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावंच असं. असो.) यानं हे प्रकरण अलीकडेच उघडकीस आणलं. ते आरोप ट्रम्प यांनी नाकारले वा अव्हेरले नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांची करचुकवेगिरी प्रकाशात आणली. तेव्हा रशियात त्यांची गुंतवणूक नसेल असं मनायाचं काहीच कारण नाही.

परंतु ही बाब नाकारताना त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर जे आरोप केले ते अधिक गंभीर आहेत. हिलरी आणि बिल क्लिंटन यांच्या क्लिंटन फाउंडेशन या संस्थेला थेट रशियन सरकारनं देणग्या दिल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे. प्रश्न तेवढाच नाही. तर या देणग्या हिलरी क्लिंटन या परराष्ट्र खात्याच्या मंत्री असताना दिल्या गेल्या आहेत, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. हा आरोप क्लिंटन परिवाराने साफ फेटाळलाय. शिवाय तो फेटाळताना या दोघांनी या संस्थेचा संपूर्ण ताळेबंदही उघड केलाय. त्यात या संस्थेला रशियन सरकारकडून मदत झाल्याचा उल्लेख नाही. पण युनायटेड बँक ऑफ स्वित्र्झलड, म्हणजेच विख्यात यूबीएस, या बँकेनं क्लिंटन फाउंडेशनला भरभरून देणग्या दिल्याचं आढळतं. तसंच गोल्डमन सॅक या जगातल्या सगळ्यात मोठय़ा, धनाढय़ बँकेने क्लिंटन यांना व्याख्यानासाठी बोलावून लक्षावधी डॉलर्सचं मानधन दिल्याचा तपशीलही त्यात आहे. पण यातली लक्षणीय अशी बाब म्हणजे या संस्थेला मिळालेल्या देणग्यांचा विनियोग मात्र क्लिंटन दाम्पत्यानं समाजोपयोगी कामांसाठीच केल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना चिकटू शकले नाहीत. ट्रम्प यांच्याबाबत मात्र असं म्हणता येत नाही. त्यांनी त्यांच्या संस्थेला मिळालेल्या देणग्यांचा विनियोग कसा केला, याचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. तो देणं ट्रम्प सातत्यानं टाळतच आलेत.

त्यात त्यांचं हे पुतिनप्रेम. त्याचमुळे रशियाची गुप्तहेर यंत्रणा अमेरिकेच्या या निवडणुकीत जरुरीपेक्षा जास्त रस घेत असल्याचं इथं मानलं जातं. जनसामान्यांच्या मनांतही त्याबाबत एक भीतीची भावना आहे. हे कमी म्हणून की काय शुक्रवारी आणखी एक बातमी आलीये. अमेरिकेच्या रशियातल्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची आणि त्यांच्यातल्या काहींचा मानसिक छळ होत असल्याची. यातल्या एका कर्मचाऱ्याला कार्यालयातनं घरी परतल्यावर बठकीच्या खोलीभर मानवी विष्ठेचा सडा पडलेला आढळला तर दुसऱ्यावर त्याच्या गृहसंकुलाच्या आवारातच हल्ला झाला.

हिलरी क्लिंटन यांनी ताबडतोब यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. रशिया हा दिवसेंदिवस असहिष्णू आणि बेजबाबदार होत असून त्यामुळेच हे असले प्रकार घडू लागल्याचं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे सीरियामध्ये रशिया जे काही करत आहे त्यालाही तातडीनं पायबंद घालायची गरज त्यांनी व्यक्त केली. रशियाला रोखायचं असेल तर ते फक्त डेमोक्रॅटिक पक्षच करू शकतो, पुतिन यांची तळी उचलणाऱ्या ट्रम्प यांचं हे काम नाही, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

या सगळ्याचं प्रतिबिंब उद्या, रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) झडणाऱ्या दुसऱ्या अध्यक्षीय वादफेरीत पडणार हे नक्की. या वादफेरीची पद्धत वेगळी आहे. पहिल्यासारखी नाही. तीत सूत्रसंचालकाप्रमाणेच सहभागींनाही ट्रम्प आणि क्लिंटन यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. या चर्चाफेरीत ट्रम्पविरोधातील आघाडीत रशिया हे क्लिंटन यांच्याकडचं प्रभावी अस्त्र असेल असं डेमोक्रॅटिक पक्षातर्फे सांगितलं जातंय.

ही नव्या शीतयुद्धाची नांदी असेल का?

अमेरिकी राजकीय वर्तुळात तसं मानलं जातंय.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber