अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान अवघं काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातली लढत चांगलीच चुरशीची होताना दिसतेय. या चुरशीच्या लढतीत हिलरी यांनी किंचितशी का असेना, पण आघाडी घेतलीये. हिलरी यांची आघाडी का घटली, त्यांच्यासमोर नव्यानं कोणत्या अडचणी उभ्या राहिल्यात ते यूएस ओपनमध्ये आपण पाहिलंच. तसंच रविवारच्या अंकात अमेरिकेतल्या पन्नासपैकी कोणत्या राज्याला किती मतं आहेत, त्याचाही तपशील आपण जाणून घेतला.

पण अशा परिस्थितीत ट्रम्प निवडून येणं शक्य आहे का? जनमताचा कौल त्यांच्या बाजूने काहीसा झुकलाय हे खरं. पण म्हणून राज्यातनं पडणारी मतं- इलेक्टोरल कॉलेज- हीदेखील ट्रम्प यांच्या पारडय़ात पडतील का? काय झालं तर ट्रम्प हे व्हाइट हाऊसचे रहिवासी होऊ शकतील? या खेळातल्या शक्याशक्यता आज पाहायला हव्यात. १०० टक्के डेमोक्रॅटिक आणि तितकीच १०० टक्के रिपब्लिकन अशी राज्यांची वर्गवारी पाहिली तर आजच्या घडीला ट्रम्प यांच्या पारडय़ात २५२ इतकी मतं आहेत, तर हिलरी या २८७च्या आसपास मतं घेताना दिसतात. आणि विजयासाठी हवी असतात किमान २७० मतं. याचा अर्थ ट्रम्प आजच्या घडीला १८ मतांनी पिछाडीवर आहेत. हा १८ मतांचा खड्डा ते कसा भरून काढू शकतात?

पहिलं म्हणजे ट्रम्प यांना सगळ्यात महत्त्वाचं असं पेनसिल्वेनिया हे राज्य खिशात घालावं लागेल. या राज्याला तब्बल २० मतं आहेत. अमेरिकेची राजधानी आणि परिसर या राज्यात येतो. पण गंमत म्हणजे १९९२ सालापासनं या राज्यानं सतत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनं कौल दिलाय. याही निवडणुकीत, सलग ३९ मतदार पाहणी चाचण्यांत ट्रम्प या राज्यात हिलरी यांच्यापेक्षा मागे पडलेत. पण तरीही यावेळी ट्रम्प यांना या राज्याकडनं आशा आहे. कारण निवडणुकीतील ट्रम्प यांची पिछाडी भरून निघण्यास सुरुवात झाली ती याच राज्यात. अमेरिकेच्या व्यापारी करारांवरचं त्यांचं घणाघाती- आणि अर्थातच वादग्रस्त- भाषण झडलं ते याच राज्यात. तेव्हापासनं ट्रम्प या राज्यात सातत्याने फेऱ्या मारतायत. हे राज्य जर ट्रम्प यांच्या बाजूनं उभं राहिलं तर अमेरिकी निवडणुकीच्या इतिहासातला तो सर्वात लक्षणीय टप्पा ठरेल. तसं झालं तर हिलरी अर्थातच पराजयाच्या दिशेनं निघालेल्या असतील.

 

पण समजा तसं झालं नाही आणि पेनसिल्वेनिया हे राज्य डेमोक्रॅटिक हिलरी यांच्या बाजूनेच उभं राहिलं तरी ट्रम्प यांच्यासाठी सगळं काही संपलं, अशी अवस्था येणार नाही. पेनसिल्वेनियातलं नुकसान भरून काढण्यासाठी ट्रम्प यांना आणखी छोटी छोटी डेमोक्रॅटिक राज्यं खिशात घालावी लागतील. त्यासाठी त्यांचा डोळा असेल तो आयोवा, नेवाडा, मेन २ आणि न्यू हॅम्पशायर या चार राज्यांवर. या राज्यांत अनुक्रमे सहा, सहा, एक आणि चार अशी मतं आहेत. यातल्या आयोवा राज्यात प्रामुख्याने गोरे अमेरिकी राहतात. हा वर्ग मोठय़ा प्रमाणावर ट्रम्प यांच्यामागे असल्याचं मानलं जातं. हे एका अर्थानं आपल्याकडच्या भाषेत बोलायचं तर भूमिपुत्र. ट्रम्प यांनी स्थलांतरितांना केलेला विरोध या गोऱ्या स्थानिकांना भावलाय. तेव्हा हे राज्य जाईलही ट्रम्प यांच्याबरोबर.

यातल्या नेवाडासाठीही ट्रम्प यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्याच आठवडय़ात ते पुन्हा एकदा या राज्यात होते. त्यानंतरच्या मतदार चाचणीत अनेकांनी ट्रम्प यांच्या बाजूनं आपलं मत व्यक्त केलं. तेव्हा हा कल असाच राहिला तर ट्रम्प यांना हे राज्य मिळू शकेल. खेरीज न्यू हॅम्पशायर राज्यातून तर ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारीची लढाई सुरू झाली. पण नंतर मात्र हे राज्य त्यांच्या बाजूला तितकंसं राहिलं नाही. ते वळवण्यात ट्रम्प यांना यश आलं तर तीदेखील मोठी घटना ठरेल.

हेही त्यांना जमलं नाही, तर एक मोठा धक्कादायक विजय त्यांना नोंदवावा लागेल. तो अर्थातच १०० टक्के डेमोक्रॅटिक राज्यातनं येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अनेक छोटी छोटी डेमोक्रॅटिक राज्यं आपल्याकडे हिसकावून घ्यावी लागतील. ती असू शकतील आयोवा आणि/किंवा नेवाडा. तसंच मिशिगन, विस्कोन्सिन, व्हर्जिनिया आणि कोलोराडो. यातल्या आयोवा आणि नेवाडाचा उल्लेख वर आहेच. तेव्हा उरलेल्या चार राज्यांची अनुक्रमे मतं आहेत १६, १०, १३ आणि नऊ अशी. यातल्या न्यू मेक्सिको, मिशिगन आणि कोलोराडो या राज्यांसाठी ट्रम्प यांचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या राज्यांपुरता त्यांनी जाहिरातींचा असा काही सपाटा लावलाय की ही राज्यं ट्रम्पमय होऊन गेली आहेत. त्या तुलनेत या राज्यांत हिलरी यांनी याच काळात जाहिराती थांबवल्या आहेत. कारण या तीन राज्यांत त्यांनी इतकी आघाडी घेतली की त्यामुळे त्यांना जाहिरातीची गरजच वाटली नाही. त्या या राज्यांत निवांत झाल्या. नेमक्या त्याच काळात ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय. याचा काही परिणाम होऊन ट्रम्प यांच्या बाजूनं यात काही मतं पडतील, असं बोललं जातंय. पण म्हणून ही राज्यं एकदम हिलरी यांच्या विरोधात कलतील?

निवडणुकीचा खेळ अतक्र्य असतो. आपल्याकडे लोकसभा निवडणुकांत दणदणीत यश मिळाल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या भाजपचं इतकं पानिपत होईल असं वाटलं होतं का कोणाला? तरी ते झालं. तेव्हा निवडणूक अमेरिकेतली असली म्हणून काय झालं? अशक्यतांचा खेळ तिथेही असतोच. तेव्हा तीन अशक्यता जर एकत्र आल्या तर ट्रम्प हे व्हाइट हाऊसचे रहिवासी असतील. या तीन अशक्यता म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्स मतदारांचा मतदानातला निरुत्साह, त्याचवेळी अशिक्षित गोऱ्या आणि बेरोजगार अमेरिकी तरुणांचा मतदानातला अतिउत्साह आणि याच्या जोडीला शिक्षित गोऱ्या मतदारांनी काही प्रमाणात ट्रम्प यांना पाठिंबा देणं.

यातल्या तीनही शक्यता एकत्र आल्या तर ट्रम्प जिंकतील. तिनापैकी दोनच प्रत्यक्षात आल्या तर हिलरी क्लिंटन यांच्याच विजयाची शक्यता अधिक. आणि एकच प्रत्यक्षात आली तर हिलरी यांचं जिंकणं निश्चित. आता लक्ष ठेवायचं तिनापैकी तीन, दोन की एक या प्रश्नाच्या उत्तराकडे.