ईदच्या निमित्ताने तरुणांना जादुची झप्पी देणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तरुणी एका मॉलच्या बाहेर तरुणांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तरुणीकडून जादुची झप्पी मिळावी यासाठी तरुणांनी अक्षरक्ष: रांग लावली होती. तरुणीने जवळपास ५० तरुणांना जादुची झप्पी दिली. यावेळी तिथे उपस्थित कोणीही एक अनोळखी मुलगी अशाप्रकारे मिठ्या मारत असल्यावरुन आक्षेप घेतला नाही असं सुरक्षारक्षकांनी सांगितलं आहे. तरुणीसोबत तिच्या दोन मैत्रिणीही होत्या.

चित्रपट पाहण्यासाठी मॉलबाहेर तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी स्कर्ट आणि शर्ट घातलेली एक तरुणी तरुणांना मिठी मारत असल्याचं पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होतं. व्हिडीओत तरुणी ईदच्या निमित्ताने आपण जादुची झप्पी देत असल्याचं बोलताना दिसत आहे. तसंच ज्यांनी ही जादुची झप्पी हवी आहे त्यांनी गोंधळ न करता रांग लावण्यासही ती सांगत आहे. विशेष म्हणजे काही वेळातच तरुणांची भली मोठी रांग लागते. यावेळी तिथे उपस्थित तिची एक मैत्रीण रांगेत उभ्या तरुणांची संख्या मोजत सर्वांना चिअर करण्याचं आवाहन करत आहे.

तरुणी जवळपास १० मिनिटे सर्वांना मिठी मारत होती. रांगेत उभ्या सर्व तरुणांना कोणतीही चिडचिड आणि घाई न करता तरुणी मिठी मारते. यावेळी तिथे उपस्थित काही लोक व्हिडीओ शूट करत असून, तिच्यासोबत सेल्फीदेखील काढत आहेत.

तरुणीकडून मिठी मिळालेला एक तरुण यावेळी सांगतो की, ‘आमच्यासाठी हे सरप्राईज होतं. एक तरुणी ईदच्या निमित्ताने अनोळखी तरुणांनी मिठी मारेल असं आम्ही अजिबात वाटलं नव्हतं. मला माहिती तिथपर्यंत असं आमच्या शहरात आजपर्यंत कधी झालेलं नाही’.

मुस्लिम धर्मात महिलेला अनोळखी व्यक्तीला मिठी मारण्याची परवानगी नाही. दरम्यान या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.