पुरामध्ये वाहून गेलेल्या मुलीचा शोध लागत नसल्याने आई-वडिलांनी मुलीचा मृत्यू झालाय असे समजून तिच्या पुतळयावर अंत्यसंस्कार केले. कर्नाटकातील कोदागू जिल्ह्यात ही घटना घडली. दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील कोदागू जिल्ह्याला पुराने दिलेल्या तडाख्यामध्ये मंजुला ही १५ वर्षांची मुलगी वाहून गेली होती. मादीकेरी जिल्ह्यातील बीत्तातूर गावात रहाणारे मंजुलाचे आई-वडिल मागच्या दोन महिन्यांपासून बेपत्ता मुलीचा शोध लागेल, तिच्याबद्दल काही तरी माहिती मिळेल म्हणून वाट पहात होते.

पण अखेरीस त्यांनी मुलीचा मृत्यू झालाय असे समजून गुरुवारी मंजुलाच्या पुतळयावर जोदूपाला गावात अंत्यसंस्कार केले. १७ ऑगस्टला याच गावातून मंजुला बेपत्ता झाली होती. दहाव्या इयत्तेत शिकणारी मंजुला कोदागू जिल्ह्यातील जोदूपाला गावात आपल्या काका-काकींकडे रहात होती. १७ ऑगस्टाला आलेल्या पूरामध्ये त्यांचे घर वाहून गेले. या कुटुंबातील एकूण चार जण बेपत्ता झाले.

एनडीआरआफला दुसऱ्यादिवशी मंजुलाच्या काका-काकींचा आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला. पण मंजुलाचा शोध लागला नाही. अखेरीस मंजुलाच्या कुटुंबियांनी तिचा पुतळा तयार केला. तिचे तीन भाऊ तो पुतळा घेऊन बीत्तातूरहून जोदूपाला गावात आले. अंत्यसंस्कार करण्याआधी मंजुलाने खेळामध्ये जिंकलेली पदके त्या पुतळयाभोवती ठेवण्यात आली नंतर कुटुंबियांनी त्या पुतळयाला मुखाग्नी दिला. मंजुलाचा मृतदेह मिळालेला नसल्याने कोदागू जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदतीचा चेक जारी केलेला नाही.