उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात विष मिसळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थिनीनेच हे विष मिसळलं होतं. विद्यार्थिनीला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. वेळेवर महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थिनीकडे चौकशी केली जात असून यामध्ये अजून कोणाचा सहभाग होता का याचा तपास केला जात आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला जेवणात विष मिसळल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनंतर बनकटा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. विद्यार्थ्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विद्यार्थिनीने मध्यान्ह भोजनात विष मिसळलं होतं. तिसरीत शिकणाऱ्या तिच्या भावाची २ एप्रिल रोजी पाचवीतील एका विद्यार्थ्याने हत्या केली होती. हत्या करणारा विद्यार्थी बालसुधारगृहात आहे. मध्यान्ह भोजनात विष मिसळून विद्यार्थिनीने संपूर्ण शाळेतील लोकांना मारण्याचा कट आखला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुदैवाने हे जेवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाही आणि मोठी दुर्घटना टळली. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याने आधीच रोखलं. महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना भात देण्यासाठी किचनमध्ये गेली असता विद्यार्थिनी संशयित अवस्थेत तिथे घुटमळत असल्याचं निदर्शनास आलं. तिच्या हातात सफेद रंगाची पावडर होती जी भाजीत पडलेली दिसत होती. यानंतर मुख्याध्यापकांना यासंबंधी सूचना देण्यात आली. पोलीस यासंबंधी तपास करत आहेत.