काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ईशान्येकडील राज्यांमधील जनतेला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी केली आहे. ईशान्येकडील विविध भागांमध्ये विविध प्रकारच्या समस्या असल्याने सर्वासाठी एकच निकष लावू नये, असेही थरूर यांनी म्हटले आहे.

ईशान्येकडील क्षेत्राबाबत अवलोक लॅन्गर यांच्या ‘इन पस्र्युट ऑफ कॉन्फ्लिक्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी येथील ऑक्सफोर्ड बुक स्टोअरमध्ये करण्यात आले त्या वेळी थरूर बोलत होते. सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्यात सुधारणा करण्यास थरूर यांनी अनुकूलता दर्शविली. या कायद्यामुळे चांगल्यापेक्षा हानीच जास्त होत असल्याचे ते म्हणाले.

ईशान्येकडील जनतेला शक्य तितकी जास्त स्वायत्तता द्यावी हे आपले स्पष्ट मत आहे. तेथील राज्यांमधील समस्या वेगवेगळ्या असल्याने विविध विभागांसाठी विविध योजना आखण्याची गरज आहे, ईशान्येकडील राज्यांमधील स्थितीमुळे ती राज्ये स्वतंत्रपणे कारभार करू शकत नसल्याने त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याच्या आपण विरोधात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.