हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ, लग्न मोडलं, पत्नीला घरातून बाहेर काढले अशा अनेक बातम्या दररोज वर्तमानपत्रात येतात. पण राजस्थानमध्ये हुंडा दिला म्हणून नवरीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये, हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यानुसार, जोधपूर कोर्टाने नवरीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२०१७ मध्ये मनीषाचे लग्न झाले होते. नवरीमुलीचे वडिल सेवानिवृत्त कर्मचारी रामलाल यांनी त्यावेळी मुलीच्या सासरच्यांना लग्नांमध्ये सामान दिले. त्यासोबत एक लाख रूपयांची रोख रक्कमही बंद पाकीटात दिली होती. मुलाचे वडिल जेठमाल यांनी हे आरोप फेटाळले आहेत, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील ब्रिजेश पारीक यांनी दिली.

बचाव पक्षाचे वकील ब्रिजेश पारीक म्हणाले की, हुंडा देणं आणि घेणं गुन्हाच आहे, त्यानुसार आम्ही रामलाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कोर्टात याचिका दाखल केली. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

पारीक म्हणाले की, हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये कलम तीन नुसार मुलीच्या वडिलांवर कारवाई झाली आहे. हुंडा देणाऱ्याच्या विरोधात पहिल्यांदाच कारवाई झाली आहे.