News Flash

मोदी सत्तेत आल्यापासून भारतामधील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

भारतामध्ये आता मुक्तपणे मतप्रदर्शन करता येत नाही, असं या अहवालामध्ये म्हटलं आहे

प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये कपात केलीय. भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे. नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलं आहे. खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचं फ्रीडम हाऊसने नमूद केलं आहे.

स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, “मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने करोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं,” असं नमूद करण्यात आलं आहे.

फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये भारतातील परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं आहे. “देशातील हिंदू राष्ट्रवादी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वाढत्या हिंसेच्या पार्शभूमीवर समर्थन करण्यात आलं. तसेच मुस्लीम लोकसंख्येला बाधा पोहचवणाऱ्या विषमता निर्माण करणारे धोरणं लागू करण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमे, वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ, नागरिक हक्कांसाठी लढणारे गट आणि आंदोलकांचे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली,” असं  फ्रिडम हाऊसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

भारताला ६७ गुण मिळाल्याने भारत आता स्वातंत्र्याच्या बाबतीत इक्वाडोअर आणि डॉमनिक रिपब्लिकच्या बरोबरीने आहे. फ्रीडम हाऊसने भारतामधील स्वातंत्र्याच्या दर्जा हा, ‘पूर्ण स्वतंत्र’ वरुन ‘अंशत: स्वतंत्र’वर आणला आहे. भारताचे मानांकन घटल्यामुळे, “याचा अर्थ देशातील २० टक्क्यांहून कमी लोकसंख्या सध्या स्वतंत्र देशांमध्ये राहते. हा आकडा १९९५ नंतरचा सर्वात कमी आकडा आहे,” असं फ्रिडम हाऊसने म्हटलं आहे.

जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलॅण्ड, नॉर्वे, स्वीडन हे पहिल्या स्थानी आहेत. तर सर्वात कमी स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सिरियाचा समावेश आहे.

“मागील वर्षभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारांनी विरोधकांवर कारवाया केल्या. तसेच करोनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादामध्ये अचानक लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे कोट्यावधी स्थलांतरित मजुरांना अनियोजित पद्धतीने स्थलांतर करावं लागलं. सत्ताधारी हिंदुत्वादी मोहिमेने मुस्लिमांविरोधातही काम केलं. करोना विषाणूच्या प्रसारासासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आलं तसेच ते झुंडबळीचेही शिकार ठरले. लोकशाही देशातील सरकार म्हणून चीनसारख्या देशातील एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवण्याऐवजी मोदी आणि त्यांच्या पक्षाने भारतालाच एकाधिकारशाहीच्या दिशेने ढकलले,” असं फ्रिडम हाऊसने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

फ्रिडम हाऊसने एकूण २५ वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रत्येक देशाचा अभ्यास केला आहे. खालील काही मुद्द्यांमुळे भारताचे गुण कमी करण्यात आले आहे…

> देशातील व्यक्ती हे त्यांची खासगी मतं किंवा राजकीय मतं किंवा इतर संवेदनशील विषयांवरील मतं आपल्यावर कोणीही दबाव आणत नसल्याचे समजून मांडू शकतात का?
या प्रश्नाच्या आधारे भारतातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आलं. “व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला जातोय. खास करुन दुजाभाव निर्माण करणारा नागरिकत्व कायदा आणि करोना साथीच्या कालावधीमध्ये हे दिसून आलं,” असं फ्रिडम हाऊसने म्हटलं आहे.

> बिगरसरकारी संस्थांना स्वातंत्र्य देण्यात आलं आहे का?
खास करुन मानवी हक्क आणि सरकारी कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थांना स्वातंत्र्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर देताना अॅमिस्टी इंटरनॅशनल आणि फॉरेन काँन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे या प्रश्नामध्येही भारताला फारसे चांगले गुण मिळालेले नाहीत.

> देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का?
या प्रश्नासंदर्भात भारताचे गुण कमी झाले आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आल्याचा मुद्दा येथे उपस्थित करण्यात आलाय. “सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने अधिक निर्णय दिले. तसेच सरकारच्या राजकीय हेतूच्या विरोधात निकाल दिल्यानंतर न्यायमूर्तींची बदली करण्यात आली,” असंही या अहवालात नमूद केलं आहे.

> देशातील नागरिकांना फिरण्याचं, कुठेही राहण्याचं, नोकरीचं आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे का?
या प्रश्नामध्ये स्थलांतरित मजुरांचे लॉकडाउनमुळे झालेले हाल पाहता भारताचे गुण कमी करण्यात आलेत. “पोलीस आणि नागरी दक्षता यंत्रणांकडून हिंसक आणि विषमता निर्माण करणाऱ्या पद्धतीने नियम लागू करण्यात आले,” असं या अहवालात म्हटलं आहे.

फ्रिडम हाऊसने आपल्या अहवालामध्ये मागील वेळेप्रमाणे यंदाही ‘इंडियन काश्मीर’चा वेगळा उल्लेख केला असून येथे स्वातंत्र्य नाहीय असं म्हटलं आहे. २०१३ ते २०१९ दरम्यान हा भाग अंशत: स्वातंत्र दर्जामध्ये होता. आता येथे स्वातंत्र नाही असं नमूद करण्यात आलं आहे.

सन २०१३ आणि २०१५ मध्ये या यादीमध्ये भारताने सलग दोनदा चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर २०१६ ते २०१८ दरम्यान भारताला ७७ गुण देण्यात आले होते. नंतर २०१९ मध्ये ७५ तर २०२० मध्ये ७१ गुण देण्यात आले होते. भारताबरोबरच यंदा बेलारुसचे स्थान आठ अंकांनी, हाँगकाँगचे तीन अंकांनी, अलर्जेरियाचे दोन अंकांनी तर व्हेनेझुएलाचे दोन अंक कमी झालेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 10:18 am

Web Title: global freedom watchdog report downgrades india from free to partly free blames modi government scsg 91
Next Stories
1 “ममता दीदींसोबत प्रचारासाठीही गेलेय, पण भाजपाची…” -अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी
2 मुलीचं शीर कापून पोलीस ठाण्यात नेत होता; रस्त्यावरील ‘ते’ दृश्य पाहून खळबळ
3 Ayesha suicide : …तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत; ओवेसी संतापले
Just Now!
X