बलात्कार प्रकरणी ‘तहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपालच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याच्यावर २८ सप्टेंबर रोजी मापुसा न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. मापुसा न्यायालयाने ठेवलेले आरोप हटवण्यात यावेत, अशी विनंती तेजपालच्या वकिलांनी गोवा उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. मात्र, न्यायालयाने ती विनंती फेटाळून तेजपालवर आरोप निश्चित करण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये गोवा येथील बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुण तेजपालवर करण्यात आला होता. या प्रकरणी तेजपालला अटक झाली होती. प्रकरण उघडकीस येताच तरुण तेजपालला ‘तहलका’ मासिकाचे संपादकपद सोडावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. माझ्यावरील आरोप हटवण्यात यावेत, अशी विनंती तेजपाल यांनी वकिलामार्फत केली होती. पण उच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळली. २८ सप्टेंबरला त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. पण या खटल्यातील साक्षीदारांची चौकशी करण्यास मापुसा न्यायालयाला मनाई करण्यात आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १ नोव्हेंबर २०१७ ला होणार आहे. दुसरीकडे या प्रकरणात राज्य सरकारच्या हस्तक्षेपावर तेजपालच्या वकिलांनी टीका केली आहे. दरम्यान, तेजपालची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.