दिल्लीत तणावपूर्ण शांतता असताना, राजीव चौक मेट्रो स्टेशन येथे वादग्रस्त घोषणाबाजी करणाऱ्या सहा जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘देश के गद्दारो को, गोली मारो’ अशी घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
राजीव चौक मेट्रो स्टेशन येथे सहा तरुणांना घोषणाबाजी करत असताना पकडण्यात आले. राजीव चौक मेट्रो पोलीस स्टेशन येथे या तरुणांना नेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दिल्ली मेट्रो ब्लू लाइनच्या ट्रेनमध्येही ‘गद्दारांना गोळी मारा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ‘गोली मारो’ अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. या घोषणा नंतर सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करताना अनेक ठिकाणी देण्यात आल्या.

भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि कुर्ता परिधान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी मेट्रो स्टेशनवर ट्रेन येत असताना घोषणाबाजी सुरु केली. ट्रेन निघून गेल्यानंतरही सीएए समर्थनाचे आणि गद्दारो को गोली मारो अशी त्यांची घोषणाबाजी सुरु होती. काही जण त्या घोषणाबाजीमध्ये सहभागी झाले तर, काहींनी त्यांच्याजवळचे मोबाइल काढून शूटींग सुरु केले. सीआयएसएफकडे दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले.