पादत्राणांवर पाच तर बिस्किटांवर १८ टक्के कर

देशातील करगुंता सोडवत सुटसुटीत करआकारणीसाठी येत्या १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) विविध वस्तूंचे कर जीएसटी परिषदेने शनिवारी निश्चित केले. त्यानुसार, सोन्यावर तीन टक्के, ५०० रुपयांखालील पादत्राणांवर पाच टक्के आणि बिस्किटांवर १८ टक्के कर लागू होणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची १५ वी बैठक शनिवारी झाली. ‘‘सध्या ५०० ते १००० रुपयांदरम्यानच्या पादत्राणांवर ६ टक्के अबकारी कर लागू होतो. मात्र, आता ५०० रुपयांपर्यंत पादत्राणांवर पाच टक्के जीएसटी लागू होईल. त्याहून अधिक किमतीच्या पादत्राणांवर मात्र १८ टक्के जीएसटी लागू होईल,’’ असे जेटली यांनी सांगितले.  ‘‘तयार कपडय़ांवर १२ टक्के, सौरऊर्जा पॅनेलवर ५ टक्के तर कच्च्या हिऱ्यावर ०.२५ टक्के जीएसटी आकारला जाईल. कपडे आणि पादत्राणांवरील करात मोठी सूट देण्यात आली असून, सामान्य जनांकडून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर कमी कर आकारण्यात येणार आहे,’’ असे जेटली यांनी स्पष्ट केले. जीएसटी लागू झाल्यानंतर विडी मात्र महागण्याचे संकेत आहेत. तेंदूपत्ता आणि विडीवर अनुक्रमे १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

  • परिषदेची ११ जूनला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जीएसटी लागू करण्यासाठी सर्व सज्जतेचा आढावा घेण्यात येईल.
  • जीएसटी परिषदेने गेल्या महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवा ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांच्या कररचनेत बसवल्या आहेत.