गुगल सर्च इंजिन आशियातील सर्वात मोठे स्वत:चे पहिले संकुल हैदराबाद येथे उभारणार आहे. अमेरिकेबाहेर प्रथमच असे संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या संकुलासाठी येत्या चार वर्षांत दुप्पट म्हणजेच आणखी ६५०० (एकूण १३ हजार) कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी त्यांना गचीबोवली येथे ७.२ एकर जमीन देण्यात आली आहे, असे तेंलगणचे माहिती तंत्रज्ञानमंत्री के. टी. रामाराव यांनी सांगितले.
के. टी. रामाराव हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना गुगल आणि तेलंगण सरकारमध्ये या बाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो अमेरिकेबाहेरील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. जवळपास दोन दशलक्ष चौ. फुटांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्णत: कार्यान्वित होणार असून तो २०१९ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.