दहा वर्षांपूर्वी गुगलने सुरू केलेली ‘ऑर्कुट’ ही सोशल नेटवर्किंग साइट येत्या ३० सप्टेंबरला इतिहासजमा होत आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ‘ऑर्कुट’ बंद करीत आहोत. भारत आणि ब्राझील या दोनच देशांत या साइटची लोकप्रियता होती. इतर देशांमध्ये या साइटचे म्हणावे तसे स्वागत झाले नाही आणि ‘फेसबुक’सारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्यासमोर ‘ऑर्कुट’ टिकणेही अवघड होते. ‘ऑर्कुट’वरील ‘पोस्ट’, अर्थात ‘स्क्रॅप्स’ हे तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरले होते. ‘स्क्रॅप्स’ पाठवताना ‘ऑर्कुट’वर युजर्सची संख्या दिसत नव्हती, हे त्यातील वैशिष्टय़ होते.
गुगलच्या मते एकटय़ा ब्राझीलमधून ५० टक्के युजर्स ‘ऑर्कुट’वर होते. त्यानंतर भारतातून (२०.४४ टक्के) युजर्सची संख्या अधिक होती. याच वेळी अमेरिका आणि पाकिस्तानातून ही हीच संख्या अनुक्रमे १७.७८ आणि ०.८६ टक्के इतकी होती. इतर सोशल नेटवर्किंग साइटच्या कामगिरीत झपाटय़ाने वाढ झाल्याने ‘ऑर्कुट’ला आपला विस्तार करणे शक्य न झाल्यामुळे ‘ऑर्कुट’ला  निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला.
२००४ मध्ये ‘ऑर्कुट’ अस्तित्वात आले. याच वर्षी फेसबुकची निर्मिती करण्यात आली. ‘फेसबुक’ ही सध्या जगातील सर्वात मोठी सोशल साइट आहे.