गुगलने मंगळवारी कंपनीची जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी कार्यायले सुरु करण्यासंदर्भातील माहिती दिली. १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ६ जुलैपासून कार्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबरपर्यंत कर्मचारी संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच घरुन काम करणाऱ्यांसाठीही कंपनीने विशेष घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

गुगलबरोबरच फेसबुकनेही मार्चच्या सुरुवातीपासूनच आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याची मूभा दिली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने एक हजार डॉलर किंवा या मुल्या इतका निधी प्रत्येक देशात घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. घरुन काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मग अगदी इलेक्ट्रीक गॅजेट्सपासून ते फर्निचरपर्यंतच्या गोष्टी घेण्यासाठी हा निधी देण्यात येणार असल्याचे गुगलनं म्हटलं आहे. २०२० वर्ष संपेपर्यंत अनेक कर्मचारी घरुन काम करण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या वर्षी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सर्वच कंपन्या प्रयत्न करत आहेत. गुगलनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मर्यादित कर्मचाऱ्यांना रोटेटिंग पद्धतीने आळीपाळीने कामावर बोलवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपेपर्यंत घरुन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्याचे वृत्त समोर आलं होतं. ‘द इन्फॉर्मेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पिचाई यांनी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य आहे त्यांनी २०२० संपेपर्यंत सध्या सुरु आहे त्याप्रमाणे घरुनच काम करावे असं सांगितलं आहे. आधी कंपनीने कर्मचारी १ जूनपर्यंत घरुन काम करतील असं म्हटलं होतं. ऑनसाईट काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी जून किंवा जुलैमध्ये आपली कार्यालये सुरु करणार असल्याचेही पिच्चाई यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. लोकांनी थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कार्यालयामधील व्यवस्थापनासंदर्भात कंपनी अतिरिक्त काळजी घेणार असल्याचेही पिचाई म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर सध्या जुलैमध्ये कार्यालयांमध्ये काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना बोलवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.