22 November 2017

News Flash

गुगल पासवर्ड ‘डिलीट’ करणार

तुमच्या हाताच्या बोटात असलेली अंगठी.. गळ्यातील चेन.. यूएसबी ड्राइव्ह.. किंवा गेलाबाजार चावी.. इ.इ.आता तुमचे

पीटीआय, लंडन | Updated: January 23, 2013 2:19 AM

तुमच्या हाताच्या बोटात असलेली अंगठी.. गळ्यातील चेन.. यूएसबी ड्राइव्ह.. किंवा गेलाबाजार चावी.. इ.इ.आता तुमचे परवलीचे शब्द अर्थात पासवर्ड बनणार आहेत. कारण माहितीच्या महाजालातील जगन्मान्य महाशोध इंजिन गुगलनेच आता पासवर्ड ‘डिलीट’ करण्याचे ठरवले आहे. येत्या काही महिन्यांत याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता ‘तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात का’ असा ‘एफएक्यू’ तुमच्या कम्प्युटरवरच येणार नाही.
गुगलच्या सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष एरिक ग्रोस आणि अभियंता मयंक उपाध्याय या दुकलीने ‘आयईईई सेक्युरिटी अँड प्रायव्हसी’ या मासिकात लिहिलेल्या यासंदर्भातील लेखात याविषयी अधिक माहिती वाचायला मिळणार आहे. नेटचा वापर सातत्याने करणाऱ्यांचे पासवर्ड हॅक होण्याचे तसेच त्यांच्या महत्त्वाच्या माहितीवर हल्ला होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यात अनेकांना अपयश आले आहे. त्यावर तोडगा म्हणूनच गुगलने आता पासवर्डऐवजी ‘फिजिकल की’चा वापर करण्याचे ठरवले आहे.

कसा होणार वापर?
नेट वापरणाऱ्याने त्याच्याकडील छोटासा यूएसबी कम्प्युटरमध्ये लावायचा म्हणजे त्याचे लॉगइन होईल. त्याला पासवर्ड टाकावा लागणार नाही. अशीच यंत्रणा तुम्ही तुमच्या अंगठीवर, चेनवर, किंवा चावीवरही बसवू शकणार आहात. म्हणजे त्यावर एक मायक्रोचीप टाकली जाईल. तीत तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती असेल. व तीच तुमचा ‘पासवर्ड’ असेल. त्यामुळे तुम्हाला कम्प्युटरवर लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज भासणार नाही.  

स्मार्टफोन-स्मार्टकार्डही उपयुक्त
या यंत्रणेसाठी स्मार्टफोन किंवा स्मार्टकार्डही उपयुक्त ठरणार आहे. तसेच मोबाइल फोनच्या माध्यमातूनही तुम्ही लॉगइन करू शकणार आहात.

वेबसाइट्सचा पाठिंबा आवश्यक
 गुगलला ही यंत्रणा राबवण्यासाठी मात्र विविध प्रकारच्या वेबसाइट्सवर विसंबून रहावे लागणार आहे. ही यंत्रणा यशस्वी होण्यासाठी वेबसाइट्सना पुढाकार घ्यावा लागणार असून त्यानंतर त्याचे यशापयश ठरवले जाईल व ती मोठय़ा प्रमाणात सुरू केली जाईल असे या दुकलीने स्पष्ट केलेआहे.

First Published on January 23, 2013 2:19 am

Web Title: google will delete password
टॅग Google