इंटरनेट स्पीडची ‘४ जी’ सुविधा दाखल झाली असतानाच आता ‘गुगल’कडून न्यू मेक्सिको येथे ‘५ जी’ इंटरनेटसाठीची चाचपणी घेण्यात आल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ वृत्तसंस्थेने दिले आहे. सध्याच्या ‘४ जी’ सेवेपेक्षा अनेकपट जलद इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सौरउर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या साहाय्याने ‘५ जी’ इंटरनेटसाठीची न्यू मेक्सिको येथे चाचणी घेण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘गुगल’ची ही ‘५ जी’ इंटरनेट सेवा ‘हाय फ्रिक्वेन्सी मिलिमीटर वेव्ह’ तंत्रज्ञानावर आधारलेली असून, प्रत्येक सेकंदाला जीबीचा डाटा स्पीड उपलब्ध होईल इतकी तगडी सेवा नेटिझन्सला मिळू शकेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञान वापरणे हे आव्हान असले तरी त्यावर तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न गुगलकडून सुरू आहेत.  ‘गुगल’ने या ‘५ जी’ इंटरनेट प्रकल्पाला ‘स्कायबेंडर’ असे नाव दिले आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास वेळ आहे. पण ड्रोन्सद्वारे इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणारी गुगल ही पहिली कंपनी नाही. याआधी फेसबुकनेही अॅक्विला प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या सहाय्याने इंटरनेट सेवेची चाचपणी केली होती.