परदेश प्रवासावरील बंदीही उठविली, पासपोर्ट परत करण्याचेही आदेश

कोलंबो : श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांची एक लाख ८५ हजार डॉलरच्या अपहारप्रकरणी करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपातून गुरुवारी उच्च न्यायालयाने मुक्तता केली आणि परदेश प्रवासावरील बंदी उठवून त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेशही दिले.

श्रीलंकेच्या घटनेतील तरतुदींनुसार अध्यक्षांविरुद्ध दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करता येत नाही अथवा सुरू असलेला खटला पुढे चालविता येत नाही, असे उपसॉलिसिटर जनरल दिलीप पेइरीस यांनी न्यायालयास सांगितले आणि त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्याची विनंती केली, असे वृत्त ‘न्यूज फर्स्ट’ने दिले आहे.

रविवारी झालेल्या निवडणुकीत माजी संरक्षण सचिव असलेल्या राजपक्ष यांची श्रीलंकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. एलटीटीईविरुद्धचा लढा संपुष्टात आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतासाठीच्या कायमस्वरूपी उच्च न्यायालयाने राजपक्षे यांच्यावरील परदेश प्रवासाची बंदी उठविली आणि जप्त करण्यात आलेला त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश न्यायालयाच्या रजिस्ट्रारना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राजपक्ष २९ नोव्हेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. विशेष उच्च न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यात राजपक्ष यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली होती.