इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतीय युवकांवरील प्रभाव कमी करण्यात केंद्र सरकारला यश आले असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे सांगितले.
आयसिसच्या विचारसरणीकडे आकर्षित होणाऱ्या युवकांची संख्या कमी व्हावी असे आम्ही प्रयत्न करीत असून त्यात आम्हाला यशही मिळाले आहे, असे या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पर्रिकर म्हणाले. राज्यातील पहिल्या केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असलेल्या हेरगिरी प्रकरणात सैन्यातील काही कर्मचाऱ्यांचा संबंध असल्याबद्दल विचारले असता संरक्षणमंत्री म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला गुप्तचरविषयक सुरक्षा आणखी कडक करावी लागली व ती आम्ही आधीच केली आहे.
आतापर्यंत भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयांतर्गत येणारी सीमा रस्ते संघटना (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) या वर्षीपासून पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आली असून तिची क्षमता वाढली आहे. यापुढे निधी मिळवण्यासाठी आम्हाला दुसऱ्या मंत्रालयाकडे जावे लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.