मागील काही दिवसांपासून अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या मागणीला अखेर यश आलं आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. मात्र मागील काही दिवसांपासून हा सत्ता संघर्षानं मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असं वळण घेतलं होतं. राज्यपालांविरोधात गेहलोत यांच्यासह संपूर्ण काँग्रेस आक्रमक झाली होती. अखेर राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात मोठं राजकीय नाट्य रंगलं. सचिन पायलट यांनी १८ आमदारांना सोबत घेत काँग्रेसविरोधात बंड छेडलं. तर मुख्यमंत्री अशोक गेहलतही त्यांच्यावर तुटून पडलेले दिसले. पायलट विरूद्ध गेहलोत असा संघर्ष सुरू असताना राज्यपाल कलराज मिश्र यांनी अधिवेशन बोलावण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हा संघर्ष राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा सुरू झाला. मागील तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, राज्यपालांकडून वारंवार अधिवेशनाची मागणी फेटाळण्यात आली.

आणखी वाचा- राजस्थानात भाजपाला धक्का; सहा आमदारांविरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली

त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसनं सर्व राज्यातील राजभवनासमोर निदर्शनं केली होती. त्याचबरोबर गेहलोत सरकारनं राज्यपालांना अधिवेशन बोलावण्यासंदर्भात सुधारित प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यात काही उणीवा दाखवत राज्यपालांनी हा प्रस्तावही परत पाठवला. त्यानंतर दुपारी राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारला अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा- लोकनियुक्त सरकार पाडणं हा भाजपाचा अजेंडा; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

गेल्या काही दिवसांपासून राजस्थान वेगवान राजकीय घडामोडी सुरू होत्या. विशेषतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यपालांनी सुरूवातील नकार दिल्यानंतर संपूर्ण काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिवेशन न घेण्याचा हेतू कधीच नव्हता असंही राज्यपालांनी गेहलोत यांना म्हटलं आहे.

मागील दोन तीन दिवसांपासून अधिवेशन बोलण्याच्या वादावर अखेर आज पडदा पडला आहे. राज्यपालांनी अधिवेशन बोलवावं म्हणून काँग्रेस आमदारांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलं होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता.