हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंदारू दत्तात्रेय यांना काही काँग्रेस सदस्यांनी शुक्रवारी विधानसभा संकुलात धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित अधिवेशन काळासाठी त्यांचे निलंबन लागू राहणार आहे.

सभापती विपीन परमार यांनी सांगितले, की विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून विधिमंडळ कामकाज मंत्री सुरेश भारद्वाज यांनी त्यांच्या निलंबनाचा ठराव मांडला.

विरोधी सदस्यांनी राज्यपालांना सभापतींच्या कक्षासमोर रोखण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांचा वाहन काफिला पुढे जात होता. त्या वेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, परमार त्यांच्यासमवेत होते. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे भाषण आटोपून राज्यपाल निघाले होते.

सभापतींनी सांगितले, की काँग्रेस कार्यकर्त्यांचे वर्तन नियमाविरोधात होते.  पाच आमदारांना  निलंबित केले तेव्हा काँग्रेसचा एकही आमदार सभागृहात नव्हता. विधानसभेचे कामकाज शुक्रवारी सोमवार दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले होते, पण नंतर पुन्हा ते बोलावून सभागृहात निलंबनाचा ठराव भारद्वाज यांनी मांडला.

विरोधी पक्षनेते अग्निहोत्री, हर्षवर्धन चौहान, सुंदर सिंह ठाकूर, सत्पाल रायजादा, विनय कुमार ही निलंबित आमदारांची नावे आहेत. राज्यपाल दत्तात्रेय यांनी विधानसभेत गोंधळ सुरू असताना भाषण वाचण्याचा प्रयत्न केला. सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सदस्य उभे राहिले. त्यांनी राज्यपालांना भाषण वाचू दिले नाही. राज्यपालांनी शेवटची ओळ वाचली. सगळे भाषण वाचण्यात आल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.

काँग्रेस सदस्यांनी आरोप केला की, भाषणातील सगळे मुद्दे खोटेपणाचे होते. गॅस, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ झाली असून त्याचा भाषणात समावेश नव्हता. अधिवेशन २० मार्चला संपणार आहे. मुख्यमंत्री २०२१-२२ चा अर्थ संकल्प  ६ मार्चला सादर करणार असल्याचे सभापती विपीन परमार यांनी सांगितले.

राज्यपालांना धक्काबुक्की म्हणजे त्यांच्यावर हल्लाच करण्यासारखे आहे. काँग्रेस आमदारांनी नैराश्यातून हे कृत्य केले असून पंचायत राज निवडणुकातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असावा.

-जयराम ठाकूर, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश