नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त म्हणजेच शनिवारी २३ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये नेताजींच्या एका चित्राचे अनावरण करण्यात आलं. मात्र राष्ट्रपती भवनामधील या चित्रावरुन एक नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील व्यक्ती ही खरे नेताजी नसून अभिनेता प्रसूनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला. प्रसूनजित यांनी श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित गुमनामी नावाच्या एका बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील प्रसूनजित यांनी साकारलेल्या भूमिकेच्या फोटोमधून हे चित्र रेखाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आता केंद्र सरकारनेच यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> या फोटोवरुन नक्की काय वाद झाला अन् कोण काय म्हणालं होतं जाणून घ्या

राष्ट्रपती भवनामधील नेताजींच्या चित्रावरुन सुरु झालेली चर्चा ही खोटी असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. तसेच हा फोटो एका अभिनेत्याचा असल्याचा दावाही केंद्राने फेटाळून लावलाय. या चित्रावरुन सुरु असणारा वाद हा खोटा असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नेताजींचे हे चित्र त्यांच्या खऱ्या फोटोवरुनच काढण्यात आल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. “हा सर्व वाद हा खोट्या माहितीच्या आधारे सुरु आहे. तसेच ही माहिती कोणतेही संशोधन न करता पसवण्यात आलीय,” असंही सरकारने म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील आक्षेप नोंदवला होता. “आता देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करु शकत नाही)”, असं म्हटलं होतं. वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनाही ट्विटवरुन हा फोटो पाहून धक्का बसल्याचं मत नोंदवलं होतं. हा प्रकार खूपच लाजिरवाणा असल्याचं बरखा यांनी ट्विटरवरुन म्हटलं होतं. ट्विटरवर इतर अनेक जणांनी हा फोटो अभिनेता प्रसूनजित चॅटर्जींचा असल्याचा दावा केला होता. एकाने गुमनाम चित्रपटाच्या कास्टींगला म्हणजे कलाकार निवडीला मानलं पाहिजे असं म्हटलं होतं. तर अन्य एकाने हे खूपच हस्यास्पद असल्याचं मत नोंदवलं होतं. हे म्हणजे भगतसिंग यांचे चित्र म्हणून अजय देवगनचा फोटो पोस्ट करण्यासारखं असल्याचा टोला लगावला होता. काहींनी हा वाद म्हणजे कपातील वादळ असल्याचं म्हटलं होतं. नेताजींचं हे चित्र खऱ्या फोटोवर आधारितच असल्याचा दावा करणारेही अनेक होते. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नसलं तरी केंद्र सरकारने आता यासंदर्भात स्पष्टीकरण देत सुरु असणारा सारा वाद हा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt refutes tmc allegation says netaji photo unveiled by president original scsg
First published on: 25-01-2021 at 17:18 IST