इन्स्टंट मेसेजिंगमधील लोकप्रिय अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने इशारा दिला आहे. मागच्या काही दिवसात व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या चिथावणीखोर संदेशांमुळे संतप्त जमावाकडून ठेचून हत्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून व्हॉट्सअॅपला असे बेजबाबदार, चिथावणीखोर मेसेजेस रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली नाराजी व्हॉट्सअॅपच्या कानावर घातली असून व्हॉट्सअॅपला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअॅपची मालकी आता फेसबुकककडे आहे. व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या खोटया आणि चिथावणीखोर मेसेजेसमुळे मागच्या काही दिवसात देशभरात जमावाच्या मारहाणीत निरपराध नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्राने या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या समजुतीतून काही जणांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाला होता. व्हॉट्सअॅपवरुन परिसरात मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती.

महाराष्ट्राप्रमाणेच आसाम, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही जमावाच्या मारहाणीत काही जणांचा मृत्यू झाला. या घटना दुर्देवी आणि दु:खद आहेत असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणारे अफवा पसरवणारे, चिथावणीखोर मेसेजेस या घटनांना काही प्रमाणात कारणीभूत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे असे मेसेज रोखण्यासाठी तात्काळ पावले उचला असे सरकारने व्हॉट्सअॅपला सांगितले आहे.