पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला असला तरी सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्क करात कपात करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण चालू असल्याने आयात महाग झाली आहे.

चालू खात्यातील वित्तीय तूट मर्यादेपलीकडे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारला पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क करात कपात करुन आर्थिक गणित बिघडवायची अजिबात इच्छा नाही असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ७९.३१ तर डिझेलचा दर ७१.३४ आहे. दिल्लीतील पेट्रोल-डिझेलचे हे सार्वकालीन उच्चांकी दर आहेत.

मंगळवारी प्रतिलिटर पेट्रोलचे दर १६ तर डिझेलचरे दर १९ पैशांनी वाढले. ऑगस्टच्या मध्यपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहेत. १६ ऑगस्टपासून प्रतिलिटर पेट्रोलच्या दर २.१७ पैसे आणि डिझेलचे दर २.६२ पैशांनी वाढले आहेत.