फेसबुकमुळे एखाद्याचं लग्न जुळल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल, पण याच फेसबुकमुळे एका तरुणाने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्न फक्त दोन दिवसांवर येऊन ठेपलं असताना नवरदेवाने ते मोडून टाकलं. आपल्या होणाऱ्या भावी पत्नीचा दुसऱ्या तरुणासोबतचा फोटो पाहिल्यानंतर नवरदेवाने थेट लग्नच मोडून टाकलं. फोटोत तरुणी साडी नेसलेली असून कुंकू लावलेलं दिसत असल्याने, तरुणाला तिचं आधीच लग्न झालं असल्याचा संशय आला. मुलीच्या घरच्यांना फोन करुन मी तिला तिच्यासोबत पतीसोबत पाहिलं असल्याचंही त्याने सांगितलं. तसंच आपण विवाहित तरुणीशी लग्न करणार नसल्याचंही त्याने कळवलं.

लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. दागिने, कपड्यांसहित सगळं काही ठरलं होतं. पण ऐनवेळी लग्न मोडल्याने मुलीच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला आहे. मुलीचं कुटुंब पश्चिम बंगालमधील सोनारपूरमधील आहे. फेसबुकवर आपल्या मुलीचा दुसऱ्या तरुणासोबतचा फोटो पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आहे. आपल्या मुलीच्या फोटोसोबत कोणीतरी छेडछाड केली आहे. हे कोणी केलं आहे माहित नाही असं मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे.

तरुणीच्या वडिलांनी सोनारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत काहीजणांना मुलीच्या फेसबुक अकाऊंटसोबत छेडछाड करत फोटो मॉर्फ केल्याची तक्रार केली आहे. ‘एका खोट्या फोटोमुळे माझं लग्न मोडलं आहे. माझी यामध्ये काही चूक नाहीये. कोणीतरी माझ्यावर असलेल्या रागातून हे केलेलं असावं. या फोटोमुळे आता कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही. माझं आधीच लग्न झालेलं आहे असंच लोकांना वाटेल’, अशी प्रतिक्रिया तरुणीने दिली आहे.

फोटोत दिसत असलेल्या तरुणाला आपण साधं ओळखतही नाही असं तरुणीचं म्हणणं आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर क्राइमची मदत घेणार आहे.