देशाचा आर्थिक विकासदर पाच टक्क्यांपर्यंत घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात जुलैमध्ये घट नोंदविण्यात आली आहे.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरणावर आधारित उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व वीजनिर्मिती या आठ क्षेत्रांत गेल्या वर्षी जुलैमध्ये ७.३ टक्के उत्पादनवाढ नोंदविण्यात आली होती. ती यंदाच्या जुलैमध्ये २.१ टक्के इतकीच नोंदवण्यात आली, असे सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादनांत घसरण नोंदवली गेली असून, पोलाद, सिमेंट व विद्युतनिर्मिती क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ६.६ टक्के, ७.९ टक्के, ४.२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ती गतवर्षी याच काळात अनुक्रमे ६.९ टक्के, ११.२ टक्के व ६.७ टक्के होती. खतांच्या निर्मितीत जुलैमध्ये १.५ टक्के वाढ झाली असून, जुलै २०१८ मध्ये ती १.३ टक्के होती. एप्रिल ते जुलैदरम्यान आठ महत्त्वाच्या क्षेत्रांतील वाढ निम्मी होऊन ती ३ टक्क्य़ांपर्यंत खाली आली. गतवर्षी ती याच काळात ५.९ टक्के होती.

एप्रिलपासून या आठ क्षेत्रांत घसरण सुरू झाली होती. एप्रिलमध्ये ती ५.८ टक्क्य़ांवरून ५.२ टक्के झाली, नंतर मे महिन्यात ४.३ टक्के झाली. आर्थिक वर्षांच्या पहिल्याच तिमाहीत आर्थिक विकास दर  ५ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन क्षेत्रातील घसरण याला कारणीभूत असून उत्पादन क्षेत्रात केवळ ०.६ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.