गेल्या कित्येक वर्षांपासून अडकून पडलेले वस्तू आणि सेवा कर विधेयक हे राज्यसभेतही मंजूर झाले आहे. २९ मार्च रोजी जीएसटीशी संबंधित चार विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. नव्या कायद्यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी १७-१८ मे रोजी मिळेल असे अरुण जेटली म्हणाले. १ जुलैपासून या कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन जीएसटी मंजूर केल्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले.
https://twitter.com/ANI_news/status/849988687182012416
जर अनेक कर संपुष्टात येऊन एक कर राहिला तर सर्व वस्तू स्वस्त होतील असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या कराबाबत म्हटले होते. जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील. जीएसटी हे १९५० पासून आतापर्यंत सर्वात मोठे अर्थविषयक विधेयक असल्याचे अरुण जेटलींनी म्हटले होते. जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. १ जुलै पासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील. जीएसटीमध्ये नफेखोरांवर नियंत्रण राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI_news/status/849988033277554693
अवाजवी कर गुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा हा एक-सामाईक, किंबहुना एकमेव अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल. जीएसटी लागू झाल्यावर तो इतर सर्व करांची जागा घेईल. केंद्र व राज्य सरकारकडून वसूल होणाऱ्या कोणत्या करांना वस्तू व सेवा कर पर्याय ठरेल. सध्या विविध कर आकारले जातात. त्यामुळे हे सर्व कर एका छत्राखाली आणून कर रचना सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने जीएसटी आवश्यक आहे.