पणजी : केंद्र सरकारने शुक्रवारी येथे झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या ३७ व्या बैठकीत देशातील आदरातिथ्य क्षेत्राला मोठा दिलासा दिला. या क्षेत्रातील अप्रत्यक्ष कराची मात्रा काही प्रमाणात कमी करताना अप्रत्यक्षरीत्या पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या समितीच्या बैठकीत आदरातिथ्यासाठी असलेल्या खोल्यांच्या भाडय़ावरील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कमी करण्यात आला. यानुसार १००१ ते ७,५०० रुपयांपर्यंत प्रति खोली-प्रति रात्र असलेल्या भाडय़ावर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के कर असेल. तर साडेसात हजार रुपयांवरील भाडय़ासाठीचा कर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्के करण्यात आला आहे. प्रति खोली, प्रति रात्र १,००० रुपयांपर्यंत भाडे असलेल्या खोल्यांना संपूर्ण करमाफी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर बाटलीबंद कॅफीनयुक्त पेयांवरील जीएसटीत तब्बल ४० टक्के इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. या पेयांवरील जीएसटी २८ टक्क्यांनी वाढविण्यात आला असून त्यात १२ टक्के अधिभाराची भर घालण्यात आली आहे. सर्व तऱ्हेच्या पॉलिथिन पिशव्यांवर १२ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. बाटलीबंद बदाम दुधावर १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे.