वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सर्वसामान्यांना दिलासा देत सुमारे २७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. यामुळे कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी १८ टक्क्यांऐवजी १२ टक्क्यांवर आला आहे. सर्व सामान्यांसह छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सरकारने दिवाळीची भेटच दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीएसटीत सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे असून या चार टप्प्यांमध्ये येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी होत होती. याशिवाय निर्यातदारांच्या समस्यांवरही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. आयुर्वेदिक औषधांवर १२ टक्के कर होता. मात्र यापुढे आयुर्वेदिक औषधांवर ५ टक्के कर असेल. याशिवाय खाकरा, चपाती, नमकीन पदार्थांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. याशिवाय पोस्टर कलरसह अनेक शालेय उपयोगी साहित्यांवर २८ ऐवजी १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक वेस्ट, रबर वेस्ट आणि पेपर वेस्टवर पाच टक्के कर आकारण्यात येईल. तर आयजीएसटी (इंटरस्टेट) करिता निर्यातदारांना सहा महिन्यांचा दिलासा देण्यात आला. निर्यातदारांसाठी एप्रिल २०१८ पासून ई-वॅलेट सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही जेटलींनी केली. हातमागावर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता, तो आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

लघू व मध्यम उद्योगांना तिमाहीतून एकदाच विवरणपत्र भरावे लागणार आहे. याशिवाय या उद्योजकांच्या वार्षिक उलाढालीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात सोनेखरेदी करणाऱ्यांनाही सरकारने दिलासा दिला. आता ५०,००० रुपये किंमतीवरील दागिन्यांसाठी पॅन आणि आधार कार्ड बंधनकारक नसेल. ही मुभा आता २ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांसाठी लागू असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst council meeting tax on 27 items reduced finance minister arun jaitley namkeen ayurvedic medicines khakra
First published on: 06-10-2017 at 22:00 IST