फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांचे धोरण काँग्रेसने अंगिकारले असून त्यांच्याकडून कायमच फोडोफोडीचे राजकारण केले जाते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. ‘फोडाफोडाचे राजकारण काँग्रेससाठी नवे नाही. आताही त्यांच्याकडून तेच सुरु आहे. जातीधर्माच्या आधारावर काँग्रेसकडून लोकांची विभागणी सुरु आहे,’ असे मोदींनी भावनगर येथील सभेला संबोधित करताना म्हटले.

‘शहरी-ग्रामीण, जात, धर्म यांच्या जोरावर समाजाची विभागणी करणे काँग्रेससाठी नवीन नाही. आताही त्यांच्याकडून तेच सुरु आहे, याचे मला आश्चर्य वाटते,’ असे मोदींनी म्हटले. ‘शांतता, एकता, सद्भावना यामुळेच गुजरातने प्रगती साधली. मात्र काँग्रेसकडून याच्या अगदी विरुद्ध भाषा वापरली जात आहे. ९ आणि १४ डिसेंबरला काँग्रेसला मतदान केल्यास ५ वर्षे दादागिरी करु, असे काँग्रेसचे समर्थक बोलत असल्याचे व्हिडिओ मी पाहिले आहेत. मात्र गुजराती जनतेला असा गुजरात नको आहे,’ असेही ते म्हणाले.

सत्तेत आल्यास १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिले आहे. याशिवाय पटेल समाजाच्या आरक्षणाबद्दलही काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यावरुनही मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘गुजराती जनतेला निवडणुकीच्या काळातील लॉलीपॉप आवडत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने खोटी आश्वासने देऊ नयेत,’ असे मोदींनी म्हटले. गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशमधील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. यावरुही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘उत्तर प्रदेशमधील जनतेला काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेतृत्त्वाची कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसला नाकारले,’ असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्यावरही शरसंधान साधले. ‘त्यांनी अनेक चुकीचे आणि असमर्थनीय खटले हाताळले आहेत. २००७ मध्ये ते विरामगाममध्ये आले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर मोदी तुरुंगात असतील, असे विधान सिब्बल यांनी केले होते. त्यावेळच्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती,’ असे मोदींनी म्हटले.