गुजरात विधानसभेची निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. त्याआधीच येथे राजकीय धुरळा उडाला आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्वच विरोधकांनी कंबर कसली आहे. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्या गटानेही भाजपच्या पराभवाचा निर्धार केला आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्यांसोबत आघाडी करण्यात येईल, असे यादव गटातील एका नेत्याने सांगितले. पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यासोबतही आघाडी करण्याचा प्रयत्न असेल, असेही या नेत्याने सांगितले.
या वर्षीच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे. गुजरात जिंकून वर्चस्व सिद्ध करण्याचा निर्धार भाजपच्या नेत्यांनी केला आहे. तर भाजपला पराभूत करण्याचा निर्धार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या गटातील नेते छोटूभाई वसावा यांनीही भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस आणि डाव्यांसोबत आघाडी करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार का, असे विचारले असता तो पक्ष भाजपसोबत आहे, असा टोला वसावा यांनी लगावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी अलिकडेच राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे वसावा यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. शरद यादव गटाने रविवारीच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवून वसावा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे.
विधानसभेवर सहा वेळा निवडून गेलेल्या वसावा यांचा आदिवासी भागात चांगलाच प्रभाव आहे. गुजरातमध्ये भाजपच्या पराभवाचा निर्धार करताना त्यांनी नोटाबंदी, जीएसटी, सरदार सरोवर धरण आदींसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. सरदार सरोवर धरणाचा येथील आदिवासींना कोणताही लाभ मिळत नाही. या धरणातील पाणी उद्योगांना देण्यात येते, असा आरोप त्यांनी केला. पक्षाचे नाव, चिन्ह मिळवण्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते जावेद रझा यांनी सांगितले.