गुजरातमधील भुज शहरात उशिरा रात्री राबवलेल्या मोहिमेत गुजरात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) लष्कर आणि सीमा सुरक्षा दल फौजांच्या हालचालींची माहिती त्यांच्या पाकिस्तानातील सूत्रधारांना पाठवण्यात सहभागी असलेल्या आयएसआयच्या दोन एजंटस्ना अटक केली.

या दोघांविरुद्ध गुरुवारी गोपनीयता कायद्याच्या (ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट) तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे दोघे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. भुज तालुक्यातील कुकमा खेडय़ात राहणारा अलाना हमी सामा (४०) आणि याच तालुक्यातील सुमरापूरचा रहिवासी असलेला त्याचा सहकारी शकूर सुमरा (३८) अशी या दोघांची नावे आहेत.

हे दोघे कच्छ भागातील लष्कराच्या तसेच सीमा सुरक्षा दलाच्या हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांना पुरवत होते असे कळल्यामुळे आम्ही काही काळापासून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होतो. याच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ते बुधवारी रात्री भुज बसस्थानकावर आले असता आम्ही त्यांना अटक केली, असे एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. एच. चावडा यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून आयएसआयच्या संपर्कात असलेल्या अलानाजवळून पाकिस्तानी कंपनीने तयार केलेला एक मोबाइल फोन, पाकिस्तानी ओळखपत्र आणि भारतातील आधार कार्ड जप्त करण्यात आले.

अलीकडच्या काळात तो भारतीय पासपोर्टवर चार वेळा पाकिस्तानला जाऊन आला, असे प्राथमिक चौकशीत आढळले असल्याचे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे. या दोघांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या संस्था त्यांची भुज येथे चौकशी करत आहेत, असेही निवेदनात नमूद केले आहे. भारत व पाकिस्तानातील सध्याच्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर या दोघांना अटक झालेली आहे.