पैशाची अतिहाव अनेकदा आपले दुप्पट नुकसान करते. गुजरातमध्ये एका बस कंडक्टरला छोटयाशा हव्यासापायी मोठी किंमत चुकवावी लागली आहे. प्रवाशाच्या तिकिटाचे नऊ रुपये स्वत:च्या खिशात टाकल्यामुळे कडंक्टरला वेतनातील १५ लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने या कंडक्टरविरोधात शिस्तभंगाची कारवाई करत त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये मोठी कपात केली. त्याशिवाय सर्व्हिस पूर्ण होईपर्यंत वेतनाची रक्कम कायम राहिल असे जीएसआरटीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंंडियाने हे वृत्त दिले आहे.

या कंडक्टरने औद्योगिक लवाद आणि गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. पण त्यांनी सुद्धा कंडक्टरची याचिका फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली. चंद्रकांत पटेल जीएसआरटीसीमध्ये बस कंडक्टर आहेत. ५ जुलै २००३ रोजी चंद्रकांत पटेल चिखली ते अंबाच गावच्या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये असताना कुदवेल गावाजवळ तिकिट तपासनीस बसमध्ये चढला. फक्त एक प्रवासी वगळता त्याने सर्वांजवळून तिकिटे जमा केली. ज्या एका प्रवाशाकडे तिकिट नव्हते त्याने मी तिकिटाचे नऊ रुपये दिले पण कंडक्टरने मला तिकिट दिले नाही असे सांगितले.

महिन्याभराने जीएसआरटीसीने विभागीय चौकशीच्यावेळी कंडक्टरला दोषी ठरवून वेतन कपातीची शिक्षा त्याला सुनावली. चंद्रकांत पटेलने नवसारी येथील औद्योगिक लवाद आणि त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली. चौकशीच्यावेळी रेकॉर्डवर जे पुरावे आहेत ते पाहता शिक्षेची गरज नाही असा युक्तीवाद पटेलच्या वकिलाने केला.

छोटयाशा गुन्हयासाठी ही खूप गंभीर शिक्षा आहे. पटेलची ३७ वर्षांची सर्व्हिस बाकी आहे. वेतनश्रेणीमध्ये कपात आणि कायमस्वरुपी एकच वेतन यामुळे चंद्रकांत पटेलचे १५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने केला. चंद्रकांत पटेलला याआधी ३५ वेळा तिकिटाच्या थकबाकीमध्ये पकडले होते अशी माहिती जीएसआरटीसीच्या वकिलाने कोर्टात दिली.