15 January 2021

News Flash

जिग्नेश मेवानींचे निमंत्रण कॉलेजच्या विश्वस्तांकडून रद्द; प्राचार्यांनी दिला राजीनामा

राज्यात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता मेवानींबाबतही असाच प्रकार घडल्याने यावरुन वाद

आमदार जिग्नेश मेवानी (संग्रहित छायाचित्र)

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एच. के. आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आमदार जिग्नेश मेवानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाठवलेले निमंत्रण कॉलेजच्या विश्वस्तांकडून अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे निमंत्रण रद्द झाल्याने याचा निषेध म्हणून कॉलेजचे प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेवानी हे सातत्याने भाजपावर टीका करीत असल्याने विश्वस्तांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सेहगल यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रण पाठवल्यानंतर आयोजकांकडून ते अचानक रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील एनजीएमएमध्ये भाषणादरम्यान औचित्यभंगाचा मुद्दा पुढे करीत पालेकरांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. यामुळे सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्काटदाबी होत असल्याचा आरोप होत असताना आता मेवानींबाबतही असाच प्रकार घडल्याने यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

वडगावचे आमदार असलेले जिग्नेश मेवानी हे या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते भाजपा सरकारचे कडवे विरोधक असल्याचे सर्वश्रृत आहे, अशा व्यक्तीच्या हस्ते विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.११) वार्षिक स्नेहसंमेलनात पुरस्कारांचे वाटप होणार होते. मात्र, कॉलेजच्या विश्वस्तांनी अचानक हा कार्यक्रमच रद्द केला. आमचा मेवानींना विरोध नाही मात्र, जर ते या कार्यक्रमाला आले असते तर कॉलेजचे वातावरण बिघडले असते, त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कॉलेजचे विश्वस्त अमरिश शाह यांनी सांगितले.

दरम्यान, मेवानींना कॉलेजमध्ये येण्यापासून रोखल्याने राजीनामा दिलेले प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी कॉलेजचे विस्वस्त मंडळी लोकशाहीविरोधी वागत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. तसेच वातावरण बिघडेल म्हणजे नक्की काय होईल याचे स्पष्टीकरण विश्वस्तांनी द्यावे अशी विचारणाही त्यांनी केली आहे. विश्वस्तांवर भाजपाशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेकडून दबाव आल्यानेच मेवानींना रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कॉलेजच्या काही लोकांनी सांगितले की, मेवानींनी जर या कार्यक्रमाला हजेरी लावली तर कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी काही विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे प्राचार्य वगळता सर्व विश्वस्त आणि उपप्राचार्य मोहन परमार यांनी हा कार्यक्रमच रद्द करण्यावर शिक्कामोर्तब केले. परमार यांनीही आपल्या उपप्राचार्य पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉलेजचा हा कार्यक्रम रद्द झाल्याने मेवानींनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपण याच कॉलेजचे विद्यार्थी आहोत, इथं आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांचे मिशन यावर बोलणार होतो. मात्र, मी प्राचार्य हेमंत शाह यांना सॅल्युट करतो ज्यांनी नैतिक कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे मेवानी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 10:12 am

Web Title: gujarat college principal quits after trustees recall jignesh mevani invite
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 धक्कादायक! तरुणीला कारबाहेर खेचून १० जणांनी केला सामूहिक बलात्कार
3 दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा मृत्यू
Just Now!
X