गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते परेश धनानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडने त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मार्चच्या अखेरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेत्याची काँग्रेसकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्याने, या दोन्ही प्रमुख नेत्यांनी हायकमांडकडे राजीनामा सोपवल्याचं बोललं जात आहे.

गुजरतामधील सहा महानगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आठवडाभराच्या आतच नगरपालिका, जिल्हा पंचायत आणि तालुक पंचात निवडणुकीत देखील भाजापने बाजी मारली आहे. शिवाय, राज्यसभा निवडणुकीत देखील दोन्ही जागा बिनविरोधपणे भाजपाला मिळालेल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला आपले दिवंगत नेते अहमद पटेल यांची जागा देखील राखता आलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ नेत्याने आपला राजीनामा सोपवल्याचे दिसत आहे.

गुजरात – काँग्रेसने अहमद पटेल यांची जागाही गमावली; भाजपाने दोन्ही जागा बिनविरोध जिंकल्या

पाटीदार आंदोलनानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार प्रदर्शन केलं होतं. मात्र आता काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जाव लागलं आहे. आगामी काळात गुजरात विधानसभा निवडणूक देखील होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पार पडलेल्या स्थानिक निवडणुका भाजपा व काँग्रेसच्यादृष्टीने महत्वाच्या होत्या, ज्यामध्ये भाजपाला यश मिळालं आहे.