जिथे गुजरातमध्ये बटाट्याच्या पिकातून योग्य तो मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहेत तिथेच एका शेतकऱ्याने आपल्या खरबूजाच्या शेतीतून तब्बल २१ लाख रुपयांची कमाई केली आहे. आता ही कमाई याने केली कशी याबाबत तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि वेगळा विचार कऱण्याची असणारी क्षमता यामुळे या शेतकऱ्याला हे शक्य झाले आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील शेतकरी खेताजी सोलंकी यांनी ही कीमया करुन दाखवली आहे. शेतात बटाट्यांच्या पिकांच्या जागी सोलंकी यांनी खरबूजाचे पीक घेतले आहे. या भागात बटाट्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे सोलंकी यांनी लढवलेली शक्कल निश्चितच कौतुकास्पद आहे.

७ वी पास असलेल्या सोलंकी यांनी या नव्या प्रयोगामुळे स्वत:चे शेत तर फुलवलेच पण त्यांनी आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही दिशा दाखवली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी खरबूजाची शेती केली आहे. यामध्ये त्यांनी चांगली वीज, ठिबक सिंचन आणि सोलर वॉटरपंप वापरला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लावलेली खरबूज एप्रिल महिन्यात तयार झाले आहेत. तसेच या खरबूजांना बाजारात उत्तम भाव मिळाल्याने तब्बल ७० दिवसांत सोलंकी यांनी २१ लाख रुपये कमावले आहेत. त्यांच्या शेतात १४० टन खरबूजांचे पीक उभे राहीले आहे. त्यांनी या शेतीसाठी १.२१ लाख रुपये खर्च केले होते.

शेतामध्ये आलेले इतके पीक विकायचे कसे असा प्रश्नही सोलंकी यांच्यासमोर उभा राहीला नाही. कारण हे खरबूज विकण्यासाठी त्यांना कोणाकडे जाण्याची वेळ आली नाही तर गुजरातबरोबरच इतर राज्यातील व्यापारीही त्यांच्याकडील खरबूज खरेदी करण्यासाठी स्वत:हून आले. त्यामुळे फारसे न शिकलेल्या सोलंकी यांनी सर्वच शेतकऱ्यांसमोर उत्तम आदर्श निर्माण केला आहे. मोबाईलमध्ये असणाऱ्या अॅप्लिकेशन्सचा वापर करुन त्यांनी उत्तम तंत्रज्ञाना शिकून त्याचा आपल्या शेतीसाठी वापर केला आहे. येत्या काळात आपल्याला चेरी आणि टोमॅटोचे पीक घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.