जाहीरनाम्यावरून भाजप लक्ष्य; दुसऱ्या टप्प्यातील सभांवर जोर

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत असून त्यात गेली २२ वर्षे सत्तेत असलेला भाजप आणि सरकारविरोधी असंतोषाला बळ देत पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाच्या युवा नेतृत्वाशी संधान बांधणारी काँग्रेस  या दोन पक्षांत निर्णायक लढतीची पहिली फेरी रंगणार आहे. एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसस्याने काँग्रेसचे आव्हान वाढले आहे.

पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघ आहेत. सूरतसारखा महत्त्वाचा भाग असलेल्या दक्षिण गुजरातमधील शहरी भागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सूरतमध्ये १६ जागा असून पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. गुजरातमधील एकूण मते लक्षात घेता भाजपकडे ४७.८ टक्के तर काँग्रेसकडे ३८.८ टक्के मतदार होते. ही नऊ टक्के मतांची दरी कमी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

गेली २२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपविरोधातील असंतोषाला मतांमध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. त्याचवेळी भाजपच्या तगडय़ा ‘पानप्रमुखां’शी  त्यांना सामना करावा लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘पानप्रमुख’ ही संकल्पना यशस्वी ठरली होती. मतदार यादीत प्रत्येक पानावर साधारण ४० ते ४५ मतदारांची नावे असतात. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पानागणिक एक कार्यकर्ता नेमण्यात आला आहे. प्रत्येक बूथसाठी २० ते २२ पानप्रमुख या हिशेबाने एका जागेसाठी सुमारे पाच ते सहा हजार पानप्रमुखांची फळी सज्ज असल्याचे भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. ते गेले दीड महिना गुजरातमध्ये आहेत. भाजपचे असे अनेक नेते आणि लाखभर कार्यकर्ते इतर राज्यांमधूनही गुजरातमध्ये आले आहेत. काँग्रेसकडे मात्र याची वानवा आहे. अनेक वर्षे सत्तेत नसल्याने काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळीच नाही. त्यामुळे काँग्रेससमर्थक मतदारांना केंद्राकडे आणण्याची चिंता वरिष्ठ नेत्यांना आहे. अर्थात गेल्या निवडणुकांपेक्षा या वेळी काँग्रेसची परिस्थिती थोडी सुधारली आहे. पूर्वी अनेक मतदान केंद्रात बसण्यासाठीही कार्यकर्ते मिळत नसत. मात्र या वेळी जुन्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आहे, असे एका नेत्याने सांगितले.

निवडणुकांसाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करीत आहेत.पोकळ विकास, पाटीदार आरक्षण, ओबीसी- दलितांवरील अत्याचार, शेतकरी- मच्छीमारांचे प्रश्न, जीएसटी-नोटबंदीचे परिणाम अशा विविध समस्या पुढे आल्याने गेल्या निवडणुकांमधील स्पर्धेत ‘अनुपस्थित’ असलेली काँग्रेस या वेळी चर्चेत आहे.

भाजपच विजयी होणार- कुशवाहा

पाटणा : गुजरातमध्ये भाजपच विजयी होणार आणि भाजपच सरकार स्थापन करणार आहे, याबाबत जर-तरचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी येथे स्पष्ट केले.

अखेर भाजपचे ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास विसरलेल्या भाजपवर टीका होऊ लागताच अरुण जेटली यांनी घाईगडबडीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या या जाहीरनाम्याला संकल्पपत्र म्हटले आहे. जागतिक मंदी असतानाही गुजरातने गेली पाच वर्षे विकासदर १० टक्क्यांवर ठेवला. हा विकासदर वाढवण्याचा संकल्प भाजपने केला आहे.तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तसेच गुजरातला खेळामध्ये पुढे नेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा तसेच राज्याच्या एकसंध ठेवण्याबाबत उल्लेख आहे. जाहीरनाम्यावर होणारी टीका तसेच आरक्षणाबाबत आश्वासन नसल्याने मतदारांचा रोष ओढवण्याची भीती यामुळे भाजप ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात होते. मात्र पहिल्या टप्प्याचे मतदान एक दिवसावर आल्याने भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात अवास्तव आश्वासने दिली असून ती प्रत्यक्षात आणणे आर्थिकदृष्टय़ा अशक्य आहे, त्याचप्रमाणे आरक्षणात बदल करणेही घटनेच्या विरोधातील आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. काँग्रेसने पाच दिवसांपूर्वीच जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

एकूण ९७७ उमेदवार!

पहिल्या टप्प्यात तब्बल ५० पक्ष रिंगणात असून त्यातील अनेक पक्ष अगदी स्थानिक व लहान आहेत. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह एकूण ९७७ उमेदवार रिंगणात असून त्यात ४४३ अपक्षच आहेत. भाजपने ८९, काँग्रेसने ८७ आणि बहुजन समाज पक्षाने ६४ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचे २५ उमेदवार पहिल्या टप्प्यात रिंगणात आहेत.