गुजरातमधून बसने अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट बंधनकारक करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरातमधील टूर ऑपरेटर कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास भाविकांना यात्रेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बसमधील सर्व भाविक गुजरातमधील होते. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने अमरनाथ यात्रेसाठी नियमावलीच तयार केली आहे. टूर बस ऑपरेटर्सनी भाविकांना बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करुन द्यावे, असे या नियमावलीत म्हटले आहे. यावर टूर ऑपरेटर कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही या नियमाचे पालन केले नाही तर आम्हाला परमिट मिळणार नाही. पण बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याचा निर्णय खर्चिक आहे. याचा भार भाविकांवरच येईल, असे मत या कंपन्यांनी व्यक्त केले आहे.

गुजरातमधून दरवर्षी सुमारे ५ ते ७ हजार भाविक अमरनाथ यात्रेला जातात. तर नोंदणी न करता सुमारे ३५ हजार भाविक यात्रेला जातात. ‘बाजारात चांगल्या दर्जाच्या एका बुलेटफ्रुफ जॅकेटची किंमत सुमारे १२ हजार आहे. नागरिकांसाठी दर्जेदार बुलेटप्रुफ जॅकेट सहज उपलब्ध होणार नाही, असे एका टूर ऑपरेटरने सांगितले. भाविक देखील यासाठी जादा पैसे मोजतील का ही शंकाच आहे, असे त्याने नमूद केले.
विशेष म्हणजे ट्रेन किंवा हवाई मार्गाने अमरनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी हा नियम लागू नाही. फक्त बसने जाणाऱ्या प्रवाशांनाच हा नियम लागू आहे, याकडेही टूर ऑपरेटर्सनही लक्ष वेधले. याशिवाय बसचालकाचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे, असेही या नियमावलीत म्हटले आहे. यावरही टूर ऑपरेटर्स नाराज आहेत.