News Flash

भाजपा आमदाराची दादागिरी, महिलेला मारल्या लाथा

भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुजरातमध्ये भाजपा आमदाराच्या दादागिरीचे भयानक रुप समोर आले आहे. नरोदामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख आहेत. बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलराम थवानी यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त करताना महिलेची माफी मागण्याची तयारी दाखवली आहे. आपल्यावर पहिल्यांदा हात उचलण्यात आला. स्वत:च्या बचावासाठी मी महिलेवर हात उचलला असे बलराम थवानी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. नीतू तेजवानी यांना मारहाण सुरु असताना बलराम थवानी त्यांच्या कार्यालयाबाहेर आले व त्यांनी महिलेला लाथा मारल्या.

पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी त्या भागातील नागरिकांसोबत बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी महिला माझ्या कार्यालयात आल्या होत्या. सोमवारी मी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून ही समस्या सोडवतो असे त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी बलराम हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

कोणीतरी मला मागून मारले. त्यानंतर मी कार्यालयाबाहेर आलो. त्यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्या दरम्यान अपघाताने मी त्या महिलेला लाथ मारली असेल. असे घडायला नको होते असे स्पष्टीकरण बलराम थवानी यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 10:32 am

Web Title: gujarat naroda bjp mla balram thawani hit nitu tejwani
Next Stories
1 आयसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार
2 जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, काश्मीरच्या शोपियनमध्ये चकमक
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X