राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी अहमदाबादमध्ये एका मुस्लीम महिलेने नवऱ्याने तिहेरी तलाक दिला म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ही महिला बचावली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. महिलेने नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. तिच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत.

राज्यसभेत कालच तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. यापुढे मुस्लीम समाजात पतीने पत्नीला तिहेरी तलाक देणे कायद्याने गुन्हा आहे. पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर त्याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पूर्ण बहुमत नसतानाही मोदी सरकारने राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात यश मिळवले.

बीजेडीने या विधेयकाला पाठिंबा दिला तर भाजपाचे सहकारी असलेले जेडीयू, एआयएडीएमके आणि अन्य खासदारांनी अनुपस्थित राहून सत्ताधाऱ्यांना मदत केली. लोकसभेत मागच्याच आठवडयात हे विधेयक मंजूर झाले होते. राज्यसभेत मंगळवारी मंजूर झालेल्या या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. त्यानंतर पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. मुस्लीम समाजातील या तिहेरी तलाकच्या या प्रथेला अनेकांचा विरोध होता.