गुजरातमधील सुरत येथे गणपती विसर्जनादरम्यान क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून २१ वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी सुरतमधील सयान येथे एका गणोशोत्सव मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडीत अडकलेला चालक वारंवार हॉर्न वाजवत होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला थांबण्याची विनंती केली. यावरुन वादही झाला. काही क्षणातच त्या चालकाने तीक्ष्ण हत्याराने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यानंतर स्थानिकांनी त्या चालकाला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

चैतन्य रावल (वय २६) असे या हल्लेखोर चालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. दुसरीकडे उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याने मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला जमावाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. जमावाने पोलिसांची गाडी पेटवून दिली. शेवटी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.