डेरा सच्चा सौदा परिसरात पोलिसांनी तपासणी सुरू केली असून गुरमित राम रहिम सिंग याच्या खोलीपासून महिलांच्या वसतिगृहापर्यंत भुयार होते. याशिवाय चिखलाने भरलेला एक वेगळा बोगदाही होता, असे स्पष्ट झाले आहे. तपासणीचा शनिवारी दुसरा दिवस होता. या भागात एक बेकायदा फटाका कारखाना व रसायने सापडली आहेत.

बाबा गुरमित राम रहिम सिंग याला गेल्या महिन्यात बलात्काराच्या प्रकरणात वीस वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. डेऱ्यात बाबाच्या गुंफेपासून साध्वी निवासापर्यंत जाणारी मार्गिका होती, असे निष्पन्न झाल्याचे जनसंपर्क उपसंचालक सतीश मिश्रा यांनी सांगितले. यात एक फायबरचा बोगदा सापडला असून तो चिखलाने भरलेला आहे.डेरा निवास हा साध्वी निवासाशी जोडलेला होता. डेऱ्यात एक बेकायदा फटाका कारखाना सापडला आहे. त्याशिवाय फटाक्यासाठी लागणारी काही रसायनेही सापडली आहेत. एके ४७ साठी लागणारी काडतुसे तेथे सापडली असून पोलिस, निमलष्करी दले या तपासणीत सहभागी आहेत. डेऱ्याची तपासणी काल पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आली होती. आलिशान मोटार, प्रतिबंधित चलनी नोटा इ.बाबाच्या गुहेची तपासणी केली असता सापडल्या आहेत. काही खोल्या बंद दिसून आल्या  तर काही ठिकाणी नावे नसलेली औषधे सापडली आहेत. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत असून त्यावर निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.एस पवार यांची देखरेख आहे.  डेऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संचारबंदी लागू असून कुणाही अनधिकृत व्यक्तीला या परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. सिरसा शहरात जनजीवन सुरळीत आहे. बाबाच्या गुफेत अगदी निकटच्या व्यक्तींशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता असे काही अनुयायांनी सांगितले. डेऱ्याचा परिसर ८०० एकरांचा असून तो दहा भागात विभागला आहे. बाबा गुरमित राम रहीम सिंग याने एमएसजी नावाने काही उत्पादने बाजारात आणली, शिवाय त्याने काही चित्रपट काढले होते; त्यात त्याने स्वत:च भूमिका केल्या होत्या.

हिंसाचार प्रकरणी तीन जणांना अटक

येथील डेरा सच्चा सौदाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाबा गुरमित राम रहीम सिंग याच्या अटकेनंतर पंचकुला येथे हिंसाचार फैलावल्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  डेरा सच्चा सौदाचे पंचकुला केंद्राचे प्रमुख चामकौर सिंग व डेराचे पदाधिकारी दान सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, असे पंचकुलाचे पोलिस उपायुक्त मनबीर सिंग यांनी सांगितले.