काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध दर्शवत पी चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असाही आरोप चिदंबरम यांनी केला.

काश्मीरची परिस्थिती निवळली आहे असं दाखवलं जातं आहे मात्र ते वास्तव नाही. भारतीय मीडिया काश्मीरमध्ये जी अशांत स्थिती दाखवत नसेल तर याचा अर्थ तिथे सारं काही आलबेल आहे असं होत नाही असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षांमध्ये भाजपाबाबत भीती आहे. त्याचमुळे कलम ३७० हटवण्यास फारसा विरोध झाला नाही असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे. बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी आम्हाला सहकार्य केले नाही कारण ते भाजपाला घाबरत आहेत असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने कलम ३७० काश्मीरमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध दर्शवाला होता. मात्र भाजपाकडे खासदारांचे बहुमत असल्याने हे विधेयक हटवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मान्य करण्यात आला. काँग्रेसने यासंदर्भात चर्चेची मागणी केली होती. या विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच अधीर रंजन चौधरी यांच्यातली खडाजंगीही पाहण्यास मिळाली होती.