मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये नजरकैदेत ठेवल्यानंतर आता हाफिजची संघटना जमात- उद- दवामध्ये नेतृत्वबदल करण्यात आला आहे. हाफिजचा मेहुणा हाफिज अब्दूल रेहमान मक्की याच्याकडे संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानने हाफिज सईदविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हाफिज सईदची नोंदणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत आली असून त्याला नजरकैदेतदेखील ठेवण्यात आले आहे. याशिवाय सईद आणि त्याच्या ३७ साथीदारांना परदेशवारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हाफिज सईदची चोहोबाजूनी कोंडी झाल्याने जमात उद दवामध्ये आता नेतृत्वबदल झाला आहे. हाफिजचा मेहुणा हाफिज अब्दूल रेहमान मक्कीची संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हाफिज सईदनंतर हाफिज मक्की हा संघटनेचा दुस-या क्रमांकाचा नेता होता. आता हाफिज नजरकैदेत असल्याने संघटनेचे कामकाज आता तो सांभाळत आहे. लाहोरमधील घरातून हाफिज सईद संघटनेची सूत्र सांभाळत असल्याचा आरोप आहे. मात्र जमात उद दवाच्या प्रवक्त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. हाफिज सईदला नजरकैदेत ठेवल्यापासून हाफिज मक्कीने लाहोर आणि अन्य भागांमध्ये सहा पेक्षा जास्त सभा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेतील सदस्यांना दिलेला शस्त्रास्त्र परवानाच रद्द केला होता. सईद आणि त्याच्या साथीदारांकडे ४४ शस्त्रास्त्रे होती. सुरक्षेच्या कारणास्तव हे परवाने रद्द करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली होती. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी हाफिज सईद दहशतवादी असून त्याला नजरकैद झाली ती देशाच्याच हिताचीच असल्याचे म्हटले होते. हाफिज सईदवर कारवाई व्हावी यासाठी भारताचे प्रयत्न सुरु असून आता मक्कीची निवड झाल्यावर गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.